महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीत भाजयुमोच्या वतीने भव्य युवा संवाद व विकसित भारत निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न!


- माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन; युवकांना विकसित भारताच्या संकल्पनेवर मार्गदर्शन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, जिल्हा गडचिरोलीच्या वतीने आज २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सुमानंद सभागृह, आरमोरी रोड, गडचिरोली येथे भव्य ‘युवा संवाद व निबंध स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते. युवकांमध्ये राष्ट्रनिर्मितीची भावना, वैचारिक जागरूकता, लेखनकौशल्य आणि विकसित भारताच्या संकल्पनेविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या निबंध स्पर्धेसाठी विकसित भारत हा विषय निश्चित करण्यात आला होता. १६ ते २१ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेत ६०० ते ८०० शब्दांमध्ये निबंध लेखन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आकर्षक रोख पारितोषिके ठेवण्यात आली होती. प्रथम पारितोषिक १५ हजार रुपये आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्याकडून, द्वितीय पारितोषिक ११ हजार रुपये माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्याकडून, तर तृतीय पारितोषिक ७ हजार रुपये भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडून देण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी युवकांच्या बौद्धिक, वैचारिक आणि सामाजिक जडणघडणीसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

विकसित भारताच्या निर्मितीत युवकांची भूमिका महत्त्वपूर्ण डॉ. अशोकजी नेते -
यावेळी उपस्थित युवक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माजी खासदार डॉ. अशोकजी नेते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प देशासमोर ठेवला आहे. स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत म्हणजेच २०४७ पर्यंत भारताला आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, तांत्रिक आणि सर्वांगीण विकासाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रस्थानी नेण्याचे स्वप्न या संकल्पनेतून मांडण्यात आले आहे.

या विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आजच्या युवकांच्या हातात देशाचे भविष्य आणि राष्ट्रनिर्मितीची मोठी जबाबदारी आहे. युवकांमध्ये शिक्षण, कौशल्य, संशोधन, नवकल्पना, उद्योजकता आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण झाली, तर भारताच्या प्रगतीला निश्चितच नवी दिशा मिळेल.

भारत देश सुजलाम् सुफलाम् व्हावा, देशातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात विकासाची संधी उपलब्ध व्हावी आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना व विकासाचा लाभ पोहोचावा, हे विकसित भारताचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. समाजातील गरीब, दलित, शोषित, पीडित, वंचित आणि दुर्बल घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. सर्वांना समान संधी, सन्मान आणि प्रगतीची संधी मिळाली, तरच विकसित भारताचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार होईल, असे त्यांनी नमूद केले.

भारतीय जनता पार्टीमध्ये युवा मोर्चा ही महत्त्वाची संघटनात्मक आघाडी असून युवकांना संघटित करणे, त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करणे आणि राष्ट्रहिताच्या कार्यासाठी प्रेरित करणे ही युवा मोर्चाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. विकसित भारताच्या संकल्पनेवर आयोजित करण्यात आलेली ही निबंध स्पर्धा युवकांच्या विचारांना चालना देणारी असून अशा उपक्रमांमधून भविष्यातील सक्षम नेतृत्व घडण्यास मदत होईल. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो. २०४७ पर्यंत भारत जगातील आघाडीचे विकसित राष्ट्र बनेल, असा विश्वासही डॉ. अशोकजी नेते यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रत्येक तालुक्यात अशा स्पर्धा आयोजित व्हाव्यात आमदार डॉ. मिलिंद नरोटे -
यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना विकसित भारत या विषयावर आयोजित करण्यात आलेली निबंध स्पर्धा ही अत्यंत चांगली आणि विचारप्रवर्तक संकल्पना असल्याचे सांगितले. युवकांना देशाच्या भविष्याबाबत विचार करण्याची, स्वतःचे विचार लेखनातून व्यक्त करण्याची आणि राष्ट्राच्या विकासातील आपली भूमिका समजून घेण्याची संधी अशा उपक्रमांतून मिळते. त्यामुळे अशा प्रकारच्या निबंध स्पर्धा केवळ जिल्हास्तरावर मर्यादित न राहता गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आयोजित करण्यात याव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच या उपक्रमासाठी आयोजकांचे अभिनंदन करून सहभागी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाच्या मंचावर आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, भाजपा प्रदेश युवा मोर्चाचे महामंत्री बादल राऊत, भाजपा प्रदेश युवा मोर्चाचे सचिव अमेय विश्वरूप, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, भाजयुमो जिल्हा महामंत्री आकाश सातपुते, भाजयुमो शहराध्यक्ष साई सिल्लमवार आदी मान्यवर उपस्थित होते.

याशिवाय भाजपाचे विविध पदाधिकारी, युवा कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. एकंदरीत, युवकांच्या विचारशक्तीला चालना देणारा, त्यांच्यात राष्ट्रनिर्मितीची जाणीव निर्माण करणारा आणि २०४७ च्या विकसित भारताच्या स्वप्नाशी नव्या पिढीला जोडणारा हा ‘युवा संवाद व निबंध स्पर्धा’ उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.





  Print






Related Photos