विरुरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा गोंधळ : सत्तूर जप्त, राजुरा हद्दीत तिघांकडून मारहाणीचा आरोप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : विरुर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अंमलदार मनोज सुनील दुबे याच्याशी संबंधित दोन घटनांनी पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. ३० सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास विरुर पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याचा आणि त्याच्या कमरेला धारदार सत्तूर आढळून आल्याचा प्रकार घडला. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी सुमारे १२ वाजता राजुरा हद्दीत आपल्यावर तिघांनी लाकडी काठीने मारहाण केल्याचा दावा दुबे याने पोलिसांना दिलेल्या जबानीत केला आहे.
सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास मनोज दुबे हा विरुर पोलीस ठाण्यात आला. यावेळी तो आरडाओरड करीत उपस्थित कर्मचाऱ्यांना दमदाटी करीत होता. त्याच्या तोंडातून मद्यप्राशन करून होता. कर्मचाऱ्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
यानंतर त्याने पोलीस ठाण्यातील मोर्चाजवळ जाऊन दरवाजा जोरजोराने आपटला. त्याला शांत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक श्यामसुंदर सूर्यवंशी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. याचवेळी दुबेच्या कमरेला धारदार हत्यार असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याची अंगझडती घेतली असता लांब पाते असलेला धारदार सत्तूर आढळून आला. तो पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी दुबे याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८५(१) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४५(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मनोज दुबे याने राजुरा पोलिसांना दिलेल्या जबानीनुसार, त्याच दिवशी दुपारी सुमारे १२ वाजता तो मोठ्या भावाची प्रकृती खराब असल्याने त्याला भेटण्यासाठी चंद्रपूरकडे मोटारसायकलने जात होता. त्यावेळी शुभम उर्फ बंटी अरुण पिपरे, प्रतीक उर्फ गोलू पिपरे, दोघे रा. पेठवार्ड, राजुरा आणि मयूर निखाडे, रा. चुनाळा यांनी पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून त्याचा पाठलाग केला ल.
चुनाळा येथे थांबला असता या तिघांनी लाकडी काठीने डोके, डोळ्याजवळ, हात, पाय आणि कंबरेच्या भागावर मारहाण केल्याचे दुबे याने जबानीत नमूद केले आहे. स्विफ्ट कारचा क्रमांक एमएच-३४-सीजे-१६६३ असल्याचेही त्याने सांगितले आहे.
विशेष म्हणजे, दुबेच्या जबानीनुसार विरुर पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस अंमलदार यांनी तो चंद्रपूरकडे जात असल्याची माहिती शुभम उर्फ बंटी पिपरे, प्रतीक उर्फ गोलू पिपरे आणि मयूर निखाडे यांना दिली, असा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर या तिघांनी त्याचा पाठलाग केल्याचे दुबेने म्हटले आहे.
मारहाणीनंतर विरुर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी दुबे याला उपजिल्हा रुग्णालय, राजुरा येथे उपचारासाठी दाखल केल्याचे त्याच्या जबानीत नमूद आहे. एकाच दिवशी पोलीस ठाण्यात गोंधळ आणि सत्तूर जप्तीची घटना घडली, तर त्यानंतर काही वेळातच पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर झालेल्या मारहाणीचा दावा केल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. सत्तूर बाळगण्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून, मारहाणीच्या घटनेत नमूद केलेल्या व्यक्तींची भूमिका आणि महिला पोलीस अंमलदार यांच्याबाबत केलेला दावा तपासात स्पष्ट होणार आहे.




Petrol Price




