जास्तीत जास्त मतदारांचा यादीत समावेशासाठी प्रयत्न करा : जिल्हाधिकारी वान्मथी सी


- एसआयआरची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
- जिल्ह्यात यादीनुसार ९ लाख ५९ हजारांवर मतदार
- दावे व हरकती नोंदवण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत
- प्रारुप मतदार यादीचे राजकीय पक्षांना वितरण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण एसआयआर अंतर्गत जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी आणि वगळलेल्या मतदारांची यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यात जास्तीत जास्त मतदारांचा समावेश यादीत होईल, यासाठी राजकीय पक्षांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले. प्रारुप यादीबाबत राजकीय पक्षांसोबत आज जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी सदर आवाहन केले. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी अनिल गावित तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रा.खलील खतीब, अविनाश मांडे, आशिष देशमुख, भैय्याजी देशमुख, प्रवीण चोरे, मनोजकुमार देशमुख, यशवंत झाडे, पंकज सत्यकार, मिलन गांधी, राजु वरटकर उपस्थित होते.
जिल्ह्यात मतदार यादीचा पहिला टप्पा चांगल्या पद्धतीने पार पडला. विविध कारणाने जवळजवळ १५ टक्के मतदार प्रारुप यादीत समाविष्ठ होऊ शकले नाही. त्यातील जे मतदार यादीत समाविष्ठ होऊ शकतात, अशा मतदारांच्या समावेशासाठी प्रशासनासोबतच राजकीय पक्षांनी देखील सहकार्य करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाल्या. प्रारुप यादीवर मतदारांना आक्षेप असल्यास तशी सुविधा देण्यात आली आहे. वेळेत आक्षेप सादर करण्यात यावे. जिल्ह्यात काही मतदान केंद्र एकत्र करण्यात आले तर काही नवीन ठिकाणी हलविण्यात आले आहे. पात्र नागरिक मतदानापासून वंचित राहू नये आणि अपात्र किंवा दुबार नोंदी यादीत राहू नयेत, हा एसआयआर प्रक्रियेचा उद्देश आहे. त्यामुळे नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून आपले नाव यादीत आहे किंवा नाही, याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वान्मथी सी यांनी केले आहे.
जिल्ह्यात बीएलओ मार्फत घरोघरी भेट देऊन Enumeration Form (EF) चे वितरण व संकलन करण्यात आले. प्राप्त माहितीच्या पडताळणीनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप यादीनुसार जिल्ह्यात ९ लाख ५९ हजार ६४ मतदारांचा समावेश आहे. सर्वेक्षणादरम्यान जिल्ह्यात १ लाख ७८ हजार १७८ अर्ज हे मृत, स्थलांतरित किंवा दुबार नोंदींमुळे गोळा होऊ शकले नाहीत. यामध्ये प्रामुख्याने मृत व्यक्ती ४७ हजार ६८८, पत्ता न सापडलेले किंवा अनुपस्थित १० हजार ३०२,कायमचे स्थलांतरित ९५ हजार ८९, पूर्वीच नोंदणीकृत २४ हजार ८४१ व इतर २५८ नोंदींचा समावेश आहे.
दावे व हरकती नोंदवण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत संधी -
नागरिकांना प्रारूप मतदार यादीवर आपले दावे आणि आक्षेप नोंदवण्यासाठी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत मुदत देण्यात आली आहे. त्यासाठी खालील फॉर्म भरून आवश्यक ती स्वयंप्रमाणित कागदपत्रे सादर करावी लागतील. फॉर्म ६ नवीन मतदार नोंदणीसाठी किंवा यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी, फॉर्म ७ नावाला हरकत घेण्यासाठी किंवा नाव वगळण्यासाठी. फॉर्म ८ नाव, पत्ता किंवा इतर तपशीलात दुरुस्ती करण्यासाठी दाखल करता येतील. त्यासाठी आवश्यक कागदपत्र जोडणे आवश्यक आहे.
दावे व हरकतींसाठी निवारणासाठी त्रिस्तरीय प्रशासकीय व्यवस्था -
दावे व हरकतींचे नियमानुसार निराकरण्यासाठी त्रिस्तरीय व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे. यामध्ये प्रथम स्तर ईआरओ स्तरावर प्राथमिक तपासणी व कार्यवाही. द्वितीय स्तर (जिल्हा निवडणूक अधिकारी) ईआरओ च्या निर्णयाविरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील करता येईल. याकरिता विधानसभा निहाय उपजिल्हाधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तृतीय स्तर (मुख्य निवडणूक अधिकारी) अंतिम अपिलासाठी मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबई यांच्याकडे दाद मागता येईल. अधिक माहितीसाठी १९५० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




Petrol Price




