महत्वाच्या बातम्या

 ठाणेगावात नळ योजनेची वीज केबल चोरीला : पाणीपुरवठा ठप्प!


- अज्ञात इसमाविरुद्ध आरमोरी पोलिसांत तक्रार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : तालुक्यातील ठाणेगाव येथे सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या पंप हाऊसमधील मुख्य वीज पुरवठा वायर (केबल) अज्ञात इसमाने कापून चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे गावातील नळ योजनेचा विद्युत पुरवठा खंडित झाला असून, संपूर्ण गावातील पाणीपुरवठा व्यवस्था विस्कळीत झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, ठाणेगाव ग्रामपंचायतींतर्गत गाढवी नदीवर नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असून, गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी नदीकाठी पंप हाऊस उभारण्यात आले आहे. या पंप हाऊसमधून वीज मोटारीद्वारे पाण्याचा उपसा करून गावात पुरवठा केला जातो. शनिवार,  २९ ऑगस्टच्या रात्री नेहमीप्रमाणे पंप हाऊसची शेवटची पाहणी झाल्यानंतर ते रविवारी सकाळी चोरी निदर्शनास येईपर्यंतच्या कालावधीत अज्ञात इसमाने संधी साधून मशीनची मुख्य विद्युत सप्लाय केबल अंदाजे ५०० फूट कापून नेली.  

पंप हाऊसमधील मशीन चालवण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेली केबलच चोरीला गेल्याने पाणीपुरवठा पूर्णपणे बंद पडला आहे. सदर साहित्य हे ठाणेगाव ग्रामपंचायतीच्या मालकीचे असून ते शासकीय व सार्वजनिक मालमत्तेचा भाग आहे. या चोरीच्या घटनेमुळे ग्रामपंचायतीचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून  गावातील पाणीपुरवठा बंद झाला आहे.

याप्रकरणी ठाणेगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने आरमोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून सार्वजनिक पाणीपुरवठा खंडित करून नागरिकांना वेठीस धरणाऱ्या अज्ञात चोरट्याचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीने केली असून आरमोरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.





  Print






Related Photos