महत्वाच्या बातम्या

 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था : भामरागड येथे संविधान दिन उत्साहात साजरा


- संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन; मूलभूत अधिकार, कर्तव्ये आणि लोकशाही मूल्यांविषयी मार्गदर्शन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी) येथे २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे मूलभूत अधिकार व कर्तव्ये तसेच लोकशाही मूल्यांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थ्यांनी संविधान दिनानिमित्त शपथ घेतली. देशाच्या संविधानाचे निष्ठेने पालन करणे, संविधानातील मूल्यांचे जतन करणे, सर्व नागरिकांना समानता, स्वातंत्र्य आणि न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणे, तसेच राष्ट्राची एकता, अखंडता आणि बंधुता अधिक दृढ करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सचिन पोहरकर सर, शिल्प निदेशक (जोडारी) यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, संविधान निर्मिती प्रक्रियेतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आणि संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेले अधिकार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. भारतीय संविधान हे देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा मजबूत पाया असून, प्रत्येक नागरिकाने संविधानातील तत्त्वे आणि मूल्ये आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

याप्रसंगी संविधानाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या लघु प्रदर्शनीचेही उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनीच्या माध्यमातून भारतीय संविधानाची माहिती आणि त्यातील विविध महत्त्वपूर्ण बाबी विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आल्या.कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन विकास वरखडे सर यांनी केले, तर  माधुरी वाघ मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. संस्थेतील अधिकारी, कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी यांच्या उत्कृष्ट समन्वयातून व उत्स्फूर्त सहभागातून हा संविधान दिन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला. संविधानातील लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करून जबाबदार नागरिकत्वाचा संदेश देणारा हा कार्यक्रम ठरला.





  Print






Related Photos