मुर्सा-देऊरवाडा-माजरी रस्त्याची अक्षरशः चाळण


- चारगाव, कुनाडा परिसरातील नागरिक त्रस्त , कोळसा खाण कामगारांचीही होतेय परवड
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भद्रावती : भद्रावती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील महत्त्वाचा मुर्सा-देऊरवाडा-माजरी मार्ग सध्या मोठमोठ्या खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. अवघ्या सहा वर्षांपूर्वी, म्हणजेच सन २०१९-२० मध्ये बांधण्यात आलेल्या या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, त्याची सद्यस्थिती वाहनचालकांसाठी धोकादायक ठरली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे चारगाव, कुनाडा, एकतानगर यासह परिसरातील हजारो नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
माजरीहून भद्रावती शहराकडे जाण्यासाठी हा मार्ग कमी अंतराचा आणि सोयीचा असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर या रस्त्याचा वापर करतात. मात्र, ठिकठिकाणी पडलेले मोठे खड्डे, उखडलेला रस्ता आणि खराब झालेला पृष्ठभाग यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे अनेक नागरिक हा मार्ग टाळून नंदोरी मार्गाने लांबचा फेरा मारत भद्रावती गाठत आहेत. परिणामी प्रवासाचा वेळ वाढण्याबरोबरच वाहनांच्या इंधनावर अतिरिक्त खर्च होत असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
कोळसा खाण कामगारांची होतेय परवड -
या रस्त्याचे महत्त्व केवळ स्थानिक वाहतुकीपुरते मर्यादित नाही. माजरी खुल्या कोळसा खाणीसह नागलोन, माजरी आणि ऐकोना येथील कोळसा खाणींमध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांसाठी हा प्रमुख मार्ग आहे. एकतानगर वसाहतही याच मार्गावर असल्याने दररोज या रस्त्यावर कामगारांची मोठी वर्दळ असते.
त्याचबरोबर प्रवासी वाहने, शेतीची साधने तसेच अवजड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची सतत ये-जा सुरू असते. त्यामुळे आधीच खराब झालेला रस्ता आणि त्यावरील मोठमोठे खड्डे अधिक धोकादायक ठरत आहेत. विशेषतः दुचाकीस्वारांना या रस्त्यावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत असून, अपघाताची शक्यता कायम आहे.
थातूरमातूर मलमपट्टी नको -
रस्त्याची दयनीय अवस्था पाहता केवळ खड्डे बुजवून तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी रस्त्याची दर्जेदार आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करणे आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाची तातडीने पाहणी करून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
दररोज हजारो नागरिक आणि कामगारांची वर्दळ असलेल्या या महत्त्वाच्या मार्गाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी. रस्त्याची केवळ वरवरची डागडुजी न करता त्याची टिकाऊ पद्धतीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.




Petrol Price




