हाजराफॉल पर्यटन स्थळाला पर्यटकांची पसंती : पर्यटनातून लाखोंचा महसूल आणि स्थानिकांना रोजगाराची संधी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : पावसाळ्यात निसर्गाने हिरवाईची शाल पांघरल्याने तालुक्यातील प्रसिद्ध हाजराफॉल पर्यटन स्थळ सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. डोंगरदऱ्यांमधून कोसळणारा मनमोहक धबधबा, सभोवतालची घनदाट वनराई आणि पावसाळ्यातील आल्हाददायक वातावरण यामुळे हाजराफॉल येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी जिल्ह्यासह बाहेरील भागातूनही पर्यटक हाजराफॉलला भेट देत आहेत. वाढत्या पर्यटक संख्येमुळे शासनाच्या महसुलात भर पडत असून, त्याचबरोबर स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत.
तीन दिवसांत दोन लाखांहून अधिक महसूल -
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीनिमित्त हाजराफॉल येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी हजेरी लावली. या एका दिवसात तब्बल १ लाख ३५ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला. त्यानंतर १६ ऑगस्ट रोजी ७८ हजार रुपये, तर नागपंचमीच्या पर्वानिमित्त १७ ऑगस्ट रोजी ३२ हजार रुपयांचा महसूल मिळाला.विशेष म्हणजे, जुलै महिन्यात हाजराफॉल पर्यटन स्थळाच्या माध्यमातून ३ लाख ९५ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. त्यामुळे हाजराफॉल हे केवळ निसर्ग पर्यटनाचे ठिकाण न राहता स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होत आहे.
पर्यटनामुळे स्थानिकांना रोजगार -
हाजराफॉल पर्यटन स्थळाच्या व्यवस्थापनासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. सुमारे ३५ स्थानिक नागरिकांना व्यवस्थापन, स्वच्छता, पर्यटक सेवा आणि इतर पर्यटनविषयक कामांमध्ये रोजगाराची संधी मिळाली आहे.दुर्गम व आदिवासीबहुल भागातील नागरिकांसाठी पर्यटनाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहेत. पर्यटन वाढल्याने स्थानिक व्यवसायांनाही चालना मिळत असून परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
सुरक्षितता आणि सुविधांवर भर -
पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता हाजराफॉल परिसरात सुरक्षितता, स्वच्छता आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. पर्यटकांना सुरक्षित, शिस्तबद्ध आणि आनंददायी अनुभव मिळावा यासाठी वन विभाग आणि संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.निसर्गाच्या कुशीत वसलेला हाजराफॉल पावसाळ्यात विशेष आकर्षण ठरत असून, येथे येणाऱ्या पर्यटकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे या पर्यटन स्थळाला भविष्यात आणखी मोठी ओळख मिळण्याची शक्यता आहे.
पर्यटन विकासासाठी अधिक प्रयत्न -
हाजराफॉल हे निसर्ग पर्यटन आणि स्थानिक विकास यांचा सुंदर संगम घडविणारे ठिकाण ठरत आहे. एका बाजूला धबधब्याचे मनोहारी रूप पर्यटकांना आकर्षित करत आहे, तर दुसऱ्या बाजूला पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांच्या हाताला काम मिळत आहे. त्यामुळे सालेकसा तालुक्याच्या पर्यटन नकाशावर हाजराफॉलचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे.
या संपूर्ण पर्यटन व्यवस्थापनासाठी उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग, सहाय्यक वनसंरक्षक सचिन डोंगरवार, वनपरिक्षेत्र अधिकारी वाळके, क्षेत्र सहाय्यक जे. जी. खान, वनरक्षक बिसेन तसेच संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोविंद मरस्कोल्हे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन स्थळाची व्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच पर्यटकांची सुरक्षितता, स्वच्छता आणि स्थानिक रोजगारनिर्मितीवर विशेष लक्ष दिले जात आहे.




Petrol Price




