प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्र देशात अव्वल
- नागपूर विभागात ३५० अन्न प्रक्रिया प्रकल्प मंजूर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : सध्याच्या काळात शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी कृषी व अन्न प्रक्रिया हा उत्तम पर्याय आहे. आजच्या आधुनिक जगात पोटभर अन्नाबरोबरच भरपूर पोषण मूल्य असणाऱ्या प्रक्रिया उत्पादनांचीही मागणी वाढत चालली आहे. यासाठीच स्थानिक, सेंद्रिय तसेच पारंपारिक उत्पादनांना वाव देण्यासाठी केंद्र पुरस्कृत आत्मनिर्भर भारत मोहिमेअतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ही योजना कृषी विभागा मार्फत संपूर्ण राज्यभर राबविली जात आहे. या योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थी घटकांतर्गत मंजूर प्रकरणांमध्ये महाराष्ट्र हे देशात प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे. तर ऑक्टोबर अखेरीस वैयक्तिक लाभार्थी घटकांतर्गत नागपूर विभागात ३५० अन्न प्रक्रिया प्रकल्प मंजूर झाले आहेत. नव्याने स्थापीत होणा-या किंवा सद्यस्थितीत कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना विस्तारीकरण, स्तर वृद्धीसाठी क्रेडिट लिंक बँक सबसिडी या योजनेतून दिली जात असून संबंधित जिल्ह्याच्या एक जिल्हा एक उत्पादनावर आधारित कृषी प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य दिले जात आहे. या योजनेंतर्गत भांडवली गुंतवणूक, सामाईक पायाभूत सुविधा, इनक्युबेशन सेंटर, स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यांना बीज भांडवल इत्यादी घटकांसाठी अर्थसहाय्य देण्यात येते. वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के, जास्तीत जास्त १० लाख तर सामाईक पायाभूत सुविधा, इन्क्युबेशन केंद्र, मुल्यसाखळी या घटकांसाठी प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के, जास्तीत जास्त ३ कोटी अर्थसहाय्य देय आहे. जास्तीत जास्त उद्योजक, शेतकरी, बेरोजगार युवक, महिला, भागीदारी संस्था तसेच गट लाभार्थीमध्ये शेतकरी उत्पादक गट, कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यता गट, सहकारी, शासकीय संस्था यांनी कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग उभारणी किंवा त्यांचे विस्तारीकरण, स्तरवृद्धी व आधुनिकीकरण करण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत सहभाग नोंदवावा, असे कृषी विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
News - Nagpur