महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्ह्यात विभागीय स्तरीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रासह विविध मत्स्यविषयक प्रकल्पांना गती देण्याच्या दृष्टीने मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक - आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचा पुढाकार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : गडचिरोली जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी तसेच स्थानिक युवक-युवतींसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने विविध महत्त्वपूर्ण मागण्यांबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली.गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या मागणीनुसार, महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री मा. ना. श्री.नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

बैठकीत मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात विभागीय स्तरीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे, पर्यटनवाढीसाठी एक्वेरियम उभारणे, तालुक्याच्या ठिकाणी मच्छी मार्केट उभारणे, गडचिरोली जिल्ह्यात झिंगा उत्पादनाला प्रोत्साहन देणे तसेच कोल्ड स्टोरेज युनिट उभारणे, यासह मत्स्यव्यवसायाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विभागीय स्तरीय प्रशिक्षण केंद्रामुळे गडचिरोली जिल्ह्यासह परिसरातील युवक-युवतींना मत्स्यपालन, मत्स्यसंवर्धन, आधुनिक मत्स्यव्यवसाय तंत्रज्ञान व मत्स्यप्रक्रिया याबाबत शास्त्रशुद्ध व व्यावसायिक प्रशिक्षण मिळणार आहे. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

तसेच मच्छी मार्केट, कोल्ड स्टोरेज आणि झिंगा उत्पादन यांसारख्या सुविधांमुळे मत्स्यव्यवसायाच्या संपूर्ण मूल्यसाखळीला बळकटी मिळून मत्स्य उत्पादकांना अधिक चांगली बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. पर्यटनवाढीसाठी प्रस्तावित एक्वेरियममुळे जिल्ह्यातील मत्स्यसंपदा, जलजीवसृष्टी आणि मत्स्यव्यवसायाची माहिती नागरिक व पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासही हातभार लागणार आहे. बैठकीदरम्यान आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी जिल्ह्याच्या गरजा व स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन विविध प्रस्ताव व सूचना मांडल्या. या प्रस्तावांबाबत आवश्यक ती तांत्रिक, प्रशासकीय व आर्थिक कार्यवाही तातडीने पूर्ण करून प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्याच्या सूचना मा. मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सकारात्मक असून, आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी मांडलेले सदर प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री मा. ना. श्री. नितेश राणे यांनी यावेळी दिले.

या प्रकल्पांमुळे गडचिरोली जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि आवश्यक पायाभूत सुविधांची जोड मिळून रोजगारनिर्मिती, स्वयंरोजगार तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री मा. ना. श्री. नितेश राणे, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार तसेच मत्स्यव्यवसाय विभागाचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.





  Print






Related Photos