महिलांच्या उत्थानासाठी मोदी सरकार प्रयत्नशील : भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष वनिता कानडे


- मुलचेरा येथील कर्तबगार व होतकरू महिलांचा स्व. सुषमा स्वराज पुरस्काराने सन्मान
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / मुलचेरा : केंद्र शासनाच्या वतीने महिलांसाठी विविध योजना अमलात आणल्या जात आहेत. अनेक महिलांना सन्मानाने जगता यावे यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरू असून महिलांसाठी विविध कल्याणकारी व हितकारी योजना सरकारकडून अमलात आणले जात आहेत. मुलींच्या शिक्षणासाठी व त्यांच्या पालन पोषणासाठीही शासनाने योजना सुरू केलेल्या आहेत. या योजनांचा महिला व युवतीनी लाभ घेऊन आपला मुलांना उच्च शिक्षण द्यावे व महिलांना समाजात सन्मानाने जगण्यासाठी पुढाकार घ्यावा.
निश्चितच देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने महिलांच्या उत्थानासाठी नानाविध योजना सुरू आहेत. त्यांचा लाभ घेऊन महिलांनी उत्तरोत्तर प्रगती करावी असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष वनिता कानडे यांनी केले. मूलचेरा येथे आयोजित देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री स्वर्गीय सुषमा स्वराज पुरस्कार वितरण सोहळ्यात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. भारतीय जनता पार्टी महिला आघाडी गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मूलचेरा येथील स्वामी विवेकानंद छात्रावास येथे आज 13मार्च रोजी महिला मेळावा व स्वकर्तुत्वाने व परिश्रम घेऊन कुटुंबाचे पालन पोषण करणाऱ्या व मुलांना उच्च शिक्षण देणाऱ्या कर्तबगार व होतकरू महिलांचा सत्कार कार्यक्रम पार पडला.
यावेळी मोलमजुरी, शेतात काम करून ,भाजीपाला विक्री करून कुटुंब सांभाळणाऱ्या व मुलांना उच्च शिक्षण देणाऱ्या कर्तृत्ववान स्त्री शक्तींना स्व. सुषमा स्वराज पुरस्कार देऊन भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा गडचिरोली जिल्ह्याच्या प्रभारी वनिता कानडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाला महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, जिल्हा सचिव सुभाष गणपती, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रकाश दत्ता, महिला आघाडीचे गडचिरोलीचे शहराध्यक्ष कविता उरकुडे, शहर महामंत्री रश्मी बाणमारे, शहर उपाध्यक्ष कोमल बारसागडे, मूलचेरा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष प्रभाती भक्त, तालुका उपाध्यक्ष वनिता सरकार, विवेकानंदपूरच्या ग्रा पं सदस्या कविता उईके, संगीता मडावी, ज्योती सोनूले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी अंगणवाडी कार्यकर्ती म्हणून उत्कृष्ट काम करणाऱ्या आलोराणी सरकार, बचत गटाच्या महिलांना सक्षम करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या संगीता मडावी, सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या ज्योती सोनुले, उत्तम महिला शेतकरी म्हणून परिचित अनिमा समददार व विविध कामे करून कुटूंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या संगीता योगेश दंडिंकवार इत्यादी कर्तबगार व होतकरू स्त्री शक्तीचा भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष वनिताताई कानडे, भाजप महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी तथा गडचिरोलीच्या माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे, जिल्हा सचिव सुभाष गणपती, मूलचेराचे तालुका अध्यक्ष प्रकाश दत्ता यांच्या हस्ते स्व. सुषमा स्वराज पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
News - Gadchiroli | Posted : 2023-03-13