महत्वाच्या बातम्या

 बनावट पदवी प्रकरणातील दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार


- पैसे परत करण्याच्या दबावामुळे आरोपी लपून फिरत होते; रॅकेटमधील आणखी साथीदारांचा शोध सुरू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : विविध विद्यापीठांच्या नावाने बनावट पदवी व प्रमाणपत्रे तयार करून ती लाखो रुपयांना विक्री केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी, १ सप्टेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे दुर्गापूर पोलीस दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करून पुढील चौकशीसाठी पुन्हा पोलीस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार परिमल गौरकर आणि अक्षय खोबरागडे यांनी आतापर्यंत सुमारे २० ते २५ जणांना बनावट पदव्या विकल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. नोकरी, उच्च शिक्षण, पदोन्नती तसेच अन्य कारणांसाठी संबंधितांनी आरोपींकडून या पदव्या खरेदी केल्याचे पोलिसांच्या तपासातून पुढे आले आहे.

दरम्यान, संबंधित पदव्यांची पडताळणी करण्यात आल्यानंतर त्या बनावट असल्याचे उघड झाले. त्यानंतर पदव्या खरेदी करणाऱ्या व्यक्तींनी आरोपींकडे पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. सततच्या पैशांच्या मागणीमुळे आरोपी अडचणीत आले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, पैसे परत करण्याच्या दबावामुळे दोन्ही आरोपी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लपून फिरत होते.

दुर्गापूरचे ठाणेदार संतोष शेगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. बनावट पदव्या व प्रमाणपत्रे तयार करण्याची पद्धत, त्यासाठी वापरण्यात आलेली साधने, आर्थिक व्यवहार तसेच बनावट प्रमाणपत्रांची विक्री करणाऱ्या साखळीचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपासासाठी पोलिसांकडून पुन्हा कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. या चौकशीत बनावट पदवी तयार करून विक्री करण्याच्या या प्रकारात आणखी कोणकोण व्यक्ती सहभागी आहेत, तसेच या रॅकेटची व्याप्ती किती आहे, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.





  Print






Related Photos