भामरागडमध्ये पूर ओसरला : मात्र पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य, अपघाताचा मोठा धोका


- पुराच्या पाण्याने पुलाची दुरवस्था
- तातडीने दुरुस्ती करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : भामरागड परिसरात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेली पूरस्थिती आता ओसरली असून, स्थानिक जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पूर ओसरल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी पुराच्या पाण्याचा मोठा फटका परिसरातील वाहतुकीला बसला आहे. येथील मुख्य नदीवरील पुलाची अत्यंत चिंताजनक अवस्था झाली असून, रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
पुराच्या पाण्याच्या प्रचंड वेगामुळे पुलावरील डांबरी रस्ता मोठ्या प्रमाणात उखडला गेला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्यासह रस्त्यावर दगडांचे ढिगारे साचले आहेत. सध्या या धोकादायक पुलावरूनच दुचाकींसह इतर वाहनांची ये-जा सुरू आहे. मात्र, पुलावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दिवसा कसेबसे खड्डे चुकवत वाहनचालक प्रवास करत असले, तरी रात्रीच्या वेळी पुलावर हे खड्डे सहजासहजी लक्षात येत नाहीत.
यामुळे रात्रीच्या सुमारास मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. लहान-मोठ्या अपघातांना आमंत्रण देणारा हा पूल प्रवाशांच्या जिवावर उठला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ पुलाची पाहणी करून खड्डे बुजविणे, रस्ता समतल करणे आणि दुरुस्तीची कामे लवकरात लवकर हाती घ्यावीत, अशी जोरदार मागणी भामरागड परिसरातील स्थानिक नागरिक व वाहनचालकांकडून केली जात आहे.




Petrol Price




