सेवा संकल्प अभियानातून बाल संरक्षणाबाबत जनजागृती


विदर्भ न्युज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : सेवा संकल्प अभियानांतर्गत महिला व बाल विकास कार्यालय, चंद्रपूर आणि रेल्वे चाईल्ड हेल्पलाईन, बल्लारशाह यांच्या संयुक्त विद्यमाने बीटीएस प्लॉट, शिवाजी वॉर्ड येथील शिवा युवा बाल गणेश मंडळाच्या परिसरात १७ सप्टेंबर रोजी बाल संरक्षण जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मीनाक्षी भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात बालकांच्या संरक्षणासह बालविवाह, बालमजुरी, बालकांवरील हिंसा व अत्याचार तसेच शासनाच्या विविध योजनांबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली. सेवा संकल्प अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक सराटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुवर्णा भटारकर, नगर सेविका शालू कुमरे, माया ठाकूर, रवी देवाळकर, गजानन पत्रकार, संजय दुर्वे, मीना शिवणकर, रीना टप्पो आदी उपस्थित होते. मार्गदर्शक म्हणून रेल्वे चाईल्ड हेल्पलाईन, बल्लारशाहचे सुपरवायझर भास्कर ठाकूर आणि केस वर्कर विजय अमर्थराज मिल्क्यू यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करण्यात आले. भास्कर ठाकूर यांनी बाल संरक्षण यंत्रणा, बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६, बालमजुरी प्रतिबंधक कायदा १९८६, तसेच बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ याबाबत माहिती दिली. विजय अमर्थराज यांनी बाल न्याय मंडळ, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती तसेच चाईल्ड हेल्पलाईन १०९८ व आपत्कालीन हेल्पलाईन ११२ यांच्या कार्याची माहिती दिली.
माया ठाकूर यांनी बालकांचे आरोग्य, पोषक आहार आणि सामाजिक सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी बालविवाहमुक्त नगर, जिल्हा आणि भारत या प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन मीना कुळसंगे यांनी केले. प्रास्ताविक माया ठाकूर यांनी केले, तर रीना टप्पो यांनी आभार मानले. कार्यक्रमाला बालकांसह गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.




Petrol Price




