बल्लारपुरात जिल्हास्तरीय आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद


- १८५ खेळाडूंचा सहभाग, विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : रोटरी क्लब ऑफ बल्लारपूर आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका क्रीडा संकुल, विसापूर येथे आयोजित सहाव्या जिल्हास्तरीय आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेचा दोन दिवसीय सोहळा उत्साहात पार पडला. २२ व २३ ऑगस्ट रोजी झालेल्या या स्पर्धेत बल्लारपूर, चंद्रपूर, राजुरा आणि गडचिरोली येथील विविध शाळांमधील तब्बल १८५ खेळाडूंनी सहभाग घेत आपल्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन केले.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना नगराध्यक्ष सौ. अल्का वाढई, चंद्रपूर मध्यवर्ती बँकेचे संचालक डॉ अनिल वाढई तसेच माजी नगराध्यक्ष व भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विजेत्या तसेच सहभागी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल क्रीडा भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी प्रोजेक्ट डायरेक्टर मनीष मूलचंदानी आणि अनूप गंगशेट्टीवार यांनी सांभाळली. स्पर्धेच्या आयोजनासाठी रोटरी व रोटरॅक्ट क्लबच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी खेळाडूंशी संवाद साधताना क्रीडा क्षेत्रातील सहभागाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, आत्मविश्वास, संघभावना आणि जिद्द विकसित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रा. सौ. शुभांगी शर्मा, रोटरी क्लबचे अध्यक्ष राजू मुंदडा, सचिव निखिल गुजरकर, प्रशांत दोंतुल
वार, अमोल वर्मा, निलेश चिमड्यालवार यांच्यासह खेळाडू, पालक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बल्लारपूर परिसरातील युवा खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या अशा स्पर्धांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.




Petrol Price




