महत्वाच्या बातम्या

 एकाच अपघाताने हिरादेवे कुटुंब उद्ध्वस्त : दोन चुलत भावांचा दुर्दैवी अंत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / वरोरा : काही क्षणांपूर्वी घरातून हसत बाहेर पडलेले दोन तरुण पुन्हा कधीच परतले नाहीत. वरोरा तालुक्यातील बोपापूर येथील सौरभ रमेश हिरादेवे (२७ ) आणि अजित पंढरी हिरादेवे (३०) यांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. वाहन परवान्यासंदर्भातील कामासाठी वरोऱ्यात गेलेल्या दोघांवर घरी परतताना काळाने घाला घातला.

२३ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास सौरभ आणि अजित हे दुचाकीने वरोऱ्याहून बोपापूरकडे परतत होते. लगान बारजवळ चंद्रपूरकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दोघेही गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तातडीने वरोरा उपजिल्हा रुग्णालय गाठले. मात्र, सौरभ याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अजित याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात येत होते. मात्र, नियतीने त्यालाही साथ दिली नाही. भद्रावतीजवळ त्याचाही मृत्यू झाला.

एका पाठोपाठ दोन तरुणांचे मृत्यू झाल्याची बातमी कुटुंबीयांवर वज्राघात ठरली. काही वेळापूर्वी सोबत असलेले दोघेही कायमचे दूर गेल्याने नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेने बोपापूर गावातही हळहळ व्यक्त होत असून, दोन कुटुंबांचा आधार अचानक हिरावला गेल्याने गावकऱ्यांमध्ये शोकाचे वातावरण आहे.

या प्रकरणी नंदकिशोर राम हिरादेवे यांनी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. चंद्रपूरकडून नागपूरकडे जाणाऱ्या अज्ञात वाहन चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीला धडक दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून निघून गेल्याचे तक्रारीत म्हटले असून, अज्ञात वाहन चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.





  Print






Related Photos