महत्वाच्या बातम्या

 पदवीधर मतदारांना मतदानासाठी विशेष रजा : खासगी कर्मचाऱ्यांना दोन तासांची सवलत


- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक; २३ ऑक्टोबरला मतदान, २७ ऑक्टोबरला मतमोजणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी प्रशासनाने शासकीय तसेच खासगी आस्थापनांतील पदवीधर मतदारांसाठी विशेष व्यवस्था केली आहे. मतदानाच्या दिवशी मतदार असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली असून, खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या पदवीधर मतदारांना मतदानासाठी कामाच्या वेळेत दोन तासांची विशेष सवलत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. मतदानाचा टक्का वाढावा आणि पात्र मतदारांना कोणत्याही अडचणीशिवाय मतदानाचा अधिकार बजावता यावा, यासाठी प्रशासनाकडून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष नैमित्तिक रजा -
लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ मधील कलम १३५-ब नुसार पदवीधर मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टीची तरतूद आहे. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार या निवडणुकीत मतदार असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे.

ही रजा संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या नेहमीच्या अनुज्ञेय नैमित्तिक रजेव्यतिरिक्त मिळणार आहे. त्यामुळे मतदानासाठी कर्मचाऱ्यांना स्वतंत्रपणे रजेची सुविधा उपलब्ध होणार आहे.

खासगी कर्मचाऱ्यांना दोन तासांची सवलत -
खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या पदवीधर मतदारांना मात्र विशेष नैमित्तिक रजा लागू होणार नाही. त्याऐवजी मतदान करता यावे, यासाठी त्यांच्या कामाच्या वेळेत दोन तासांची विशेष सवलत देण्याच्या सूचना प्रशासनाकडून संबंधित आस्थापनांना देण्यात आल्या आहेत.

मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेत योग्य ती सवलत देऊन त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घ्यावी, असे निर्देश निवडणूक शाखेकडून देण्यात आले आहेत.

दरम्यान, मतदानाच्या दिवशी मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये आणि जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात येत आहे. निवडणुकीसंदर्भातील अधिकृत माहिती मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.





  Print






Related Photos