अनधिकृत व बेकायदेशिर वैद्यकीय व्यवसाय करणा-यांवर कारवाई करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश


- बोगस डॉक्टर शोध मोहिम समितीची सभा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, नागरिकांनी देखील अशा अनधिकृत व्यक्तींकडून उपचार घेणे टाळावे आणि संशयास्पद व्यक्तींची माहिती तात्काळ प्रशासनाला द्यावी, अनधिकृतपणे व बेकायदेशीररीत्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर तातडीने व कडक कायदेशीर कारवाई करण्यासाठी मोहिम राबवावी असे निर्देश जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी दिले.
अनधिकृतपणे व बेकायदेशीररीत्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर तातडीने व कडक कायदेशीर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय समितीची महत्त्वाची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी सुचना केल्या या सभेला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजसिंग पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले आणि इतर संबंधित वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन, महाराष्ट्र स्टेट डेंटल कौन्सिल किंवा महाराष्ट्र होमिओपॅथी कौन्सिल या वैधानिक परिषदांकडे अधिकृत नोंदणी नसलेली कोणतीही व्यक्ती महाराष्ट्रात वैद्यकीय व्यवसाय करू शकत नाही. त्यामुळे सर्व अधिकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी आपल्या दवाखान्याच्या किंवा क्लिनिकच्या दर्शनी भागात आपले मूळ नोंदणी प्रमाणपत्र लावणे कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. नागरिकांनी देखील अशा प्रकारचे मूळ नोंदणी प्रमाणपत्र नसलेल्या डॉक्टरांकडून उपचार घेऊ नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले.
महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसायी अधिनियम १९६१ च्या कलम ३३ व ३३-अ अन्वये अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणे हा दखलपात्र व गैरजमानती गुन्हा ठरतो. या कायद्यानुसार पहिल्या गुन्ह्यासाठी २ ते ५ वर्षांपर्यंत सश्रम कारावास व २ हजार ते १० हजार रुपयांपर्यंत दंड, तर दुसऱ्यांदा असा गुन्हा केल्यास १० वर्षांपर्यंत सश्रम कारावास व २५ हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची कठोर तरतूद आहे. यासोबतच, स्वतः अधिकृत डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णांवर उपचार करणाऱ्यांवर भारतीय दंड विधान च्या कलम ४१९, ४२० अन्वये फसवणुकीचे तसेच कलम ४६५, ४६८ अन्वये बनावट प्रमाणपत्र बाळगल्याप्रकरणी कडक गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
तालुकास्तरावर बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी तालुकास्तरीय बोगस डॉक्टर शोध समिती सक्रिय करण्यात आली असून गट विकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्त पथकांमार्फत कसून शोध मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांना आपल्या परिसरात कोणतीही अनधिकृत पदवी नसलेली व्यक्ती किंवा बोगस डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करताना आढळल्यास, त्याबाबतची माहिती तातडीने जवळचे तालुका आरोग्य कार्यालय किंवा पोलीस प्रशासनास द्यावी, जेणेकरून जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रवृत्तींवर कडक कायदेशीर कारवाई करता येईल, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.




Petrol Price




