नक्षलग्रस्त अतीदुर्गम असलेल्या गडचिरोली जिल्हयातील कृषि पंपांची रात्रीची लोडशेडिंग बंद करा
- आमदार डॉ. देवराव होळी
- भेंडाळा परिसरातील लोडशेडिंगच्या प्रश्नाला धरून आ. डॉ. देवराव होळी यांनी घेतली एम.एस.ई.बी. च्या अधिकाऱ्यांची बैठक
- येत्या मंगळवारला मुंबईत ऊर्जा मंत्र्यांशी याबाबत पत्र देवून चर्चा करणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : राज्याच्या शेवटच्या टोकावरील असलेला गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम, नक्षलग्रस्त जिल्हा आहे. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची उद्योगाची साधने नाहीत. शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. आणि त्यातही रात्रीच्या काळात शेतीच्या पंपांची वीज लोडशेडिंग मुळे खंडित असते. यामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे. त्यातच जिल्ह्यात असामाजिक तत्त्वांच्या कारवायाही मोठ्या प्रमाणात होत आहेत. अशावेळी जिल्ह्यात रात्रीच्या काळात लोडशेडिंग असणे योग्य नाही त्यामुळे किमान नक्षलग्रस्त असणाऱ्या या जिल्ह्यातील रात्रीची लोड शेडिंग बंद करावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी प्रशासन व सरकारकडे केली आहे.
भेंडाळा परिसरातील लोडशेडिंगच्या प्रश्नाला धरून आमदार डॉ. देवराव होळी यांनी आपल्या चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये एम.एस.ई.बी. च्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
बैठकीला भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, महामंत्री साईनाथ बुरांडे भोजराज भगत, भुवनेश्वर चुधरी, भाऊजी देहलकार, भैय्याजी वाढई, विलास उईके यांचे सह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीमध्ये आमदार डॉ देवराव होळी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना याबाबत शासनाकडे गांभीर्याने पाणी पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले. गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठे उद्योग नाहीत. या ठिकाणी व्यवसायालाही फार मोठी संधी नाही. त्यातच वनाचे प्रमाण अधिक असल्याने शेतीचे प्रमाण कमी आहे. त्यातही कृषी पंपांना दिल्या जाणाऱ्या वीज पुरवठा रात्रीच्या वेळी खंडित केला आहे. धानाचे पीक निघण्याच्या शेवटच्या टप्यावर असल्याने आता वीजपुरवठा खंडित ठेवणें योग्य नाही. यामुळे शेतकऱ्यांना फारच नुकसान नाही त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन किमान नक्षलग्रस्त असणाऱ्या गडचिरोली सारख्या जिल्ह्यात रात्रीची लोड शेडिंग तातडीने बंद करावी अशी मागणी आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
याबाबत आपण येत्या मंगळवारी ऊर्जामंत्री व कृषिमंत्री यांची भेट घेऊन जिल्ह्यातील कृषी पंपांना असणाऱ्या लोडशेडिंग बाबत पत्र देऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
News - Gadchiroli