महत्वाच्या बातम्या

 पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करावी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : बियाणे जमिनीत पेरण्यापtर्वी जमिनीतून किंवा बियाण्यातून पसरणारे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच बियाण्यांची उगवण क्षमता वाढविण्यासाठी व रोपे जोमदार वाढविण्यासाठी बियाण्यांवर वेगवेगळी जैविक व रासायनिक औषधांची बीज प्रक्रिया केली जाते. शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करूनचे पेरणी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बीज प्रक्रियेचे फायदे : जमिनीतून व बियाण्यांद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. बियाण्याची उगवण क्षमता वाढते, रोपे सतेज व जोमदार वाढतात. पिकांच्या उत्पादनात वाढ होते. बिजप्रक्रियेसाठी कमी खर्च होतो. त्यामुळे ही कीड व रोग नियंत्रणाची किफायतशीर पध्दत आहे.

जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया : नत्र स्थिरीकरणासाठी सोयाबीन गटाचे रायझोबिअम २५० ग्रॅम आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू २५० ग्रॅम या जिवाणूसंवर्धकाचे पॉकीट प्रति १० किलो सोयाबीन बियाण्यास  वापरावे. १ लिटर गरम पाण्यात १२५ ग्रॅम गुळ टाकून द्रावण तयार करावे. सोयाबिन बियाणे ओलसर करुन घ्यावे. द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये २५० ग्रॅम जिवाणू संवर्धक टाकून बियाण्यास हळूवारपणे लावावे. नंतर बियाणे सावलीत स्वच्छ कागदावर सुकवावे. अशा बिज प्रक्रिया केलेल्या बियाण्याची पेरणी ताबडतोब करावी. याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत नाही. जमिनीतील सेंद्रीय पदार्थ कुजवून जमीन सुधारण्यास मदत होते.

जिवाणू संवर्धक बीज प्रक्रियेबाबत दक्षता : जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया ही बुरशीनाशके किंवा कीटकनाशकांची प्रक्रिया केल्यानंतर करण्यात यावी. जिवाणू संवर्धक लावण्यापूर्वी जर बियाण्यास कीटकनाशके, बुरशीनाशके इत्यादी लावलेले असतील तर जिवाणू संवर्धक नेहमीपेक्षा दीडपट जास्त लावावे.

जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया : सोयाबीन पिकावरील अनेक प्रकारच्या बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी प्रती किलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा वापरावे. ट्रायकोडर्मा ही एक प्रकारची बुरशी असून ती पिकांना हानीकारक नसते उलटपक्षी बियाण्यांवर वरील रोग पसरविणाऱ्या बुरशीची वाढ न होऊ देता जमिनीमध्ये रोगकारक बुरशीचा नायनाट करुन पिकांचे संरक्षण करते. ट्रायकोडर्मा बिजप्रक्रिया  करतांना बियाणे स्वच्छ फरशी, प्लॅस्टिक किंवा ताडपत्रीवर पातळ थरात पसरवून ट्रायकोडर्मा ओलसर करुन  शिंपडावे नंतर हलक्या हाताने बियाण्यास चोळावे. प्रक्रिया केलेले बियाणे अर्धा तास सावलीत सुकवून पेरणी करावी. मात्र ट्रायकोडर्माचा बिजप्रक्रियेसाठी वापर करतांना रासायनिक खतांसोबत किंवा रासायनिक बुरशीनाशकांच्या सोबत वापर करु नये.  ट्रायकोडर्मा सुर्यप्रकाशापासून दूर, कोरड्या व थंड जागेत साठवावे.  

रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया : सोयाबीन पिकावरील अनेक प्रकारच्या बुरशीजन्य  रोगांपासून संरक्षण करण्यासाठी प्रती किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरम किंवा २.५ग्रॅम कार्बेन्डाझिम वापरावे. सोयाबीन बियाणे ओलसर करुन घ्यावे. अशी प्रक्रिया करतांना हातामध्ये रबरी किंवा प्लॅस्टिकचे हातमोजे वापरावेत. प्रती १० किलो बियाण्यास १०० मिली पाणी वापरुन बुरशीनाशकाचे घट्टसर द्रावण करुन ते सोयाबीन बियाण्यास घोळसावे जेणेकरुन बुरशीनाशक बियाण्यास सारख्या प्रमाणात सहजतेने चिकटेल. त्यानंतर प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरावे, असे कृषि विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

  Print


News - Wardha
Related Photos