धाम नदी संवाद यात्रेत खासदार, जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ नदींचे पुनरुज्जीवन केले जात आहे. यासाठी निवडलेल्या नदींचा अभ्यास करण्यासाठी चला जाणूया नदीला हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत जिल्ह्यात धाम नदी संवाद यात्रा राबविली जात असून आज खरांगणा (मो) येथे या यात्रेत खा. रामदास तडस व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सहभागी झाले होते.
यावेळी आर्वीचे उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, सेवानिवृत्त अभियंता तथा जलसमन्वय समितीचे सुनील राहाणे, जलतज्ज्ञ माधव कोटस्थाने, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला धाम नदीपात्रात खा. रामदास तडस, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याहस्ते जलपूजन करण्यात आले. खरांगणा मोरांगणा येथील धाम नदी परिसर व कामांची पाहणी त्यांनी केली. नदीपासून शहीद स्मारकपर्यंत लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, स्वावलंबी विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थ्यांच्या सहभागाने जलजागृती रॅली काढण्यात आली. त्यात देखील मान्यवर सहभागी झाले होते.
पाण्याची प्रत्येकालाच मोठ्या प्रमाणावर गरज भासते. परंतू पाणी अडविण्यासाठी कोणी पुढाकार घेत नाही. पाऊस येतो आणि त्याचे पाणी वाहून जाते. आज ख-या अर्थाने पाणी अडविण्याची गरज आहे, असे यावेळी आपले विचार व्यक्त करतांना खा. रामदास तडस यांनी सांगितले. केंद्र, राज्य सरकारच्या माध्यमातून विविध विकासकामे करण्यात येत असल्याचे खा. तडस पुढे म्हणाले.
नद्या चांगल्या करण्यासाठी अधिक काम करावे लागणार आहे. यासाठी वेगवेगळ्या आघाड्यांवर काम केले जात आहे. बदलाची सुरुवात स्वतःपासून करावी. नदी प्रदुषित होणार नाही, याची काळजी आपण घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना शिक्षण सर्वांचे आयुष्य बदलू शकते. मनापासून अभ्यास करा. करियरचा योग्य पर्याय निवडा आणि त्यादृष्टीने तयारी करा. अभ्यासातूनच आयुष्य बदलू शकेल, असे पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुरलीधर बेलखोडे यांनी केले. संचालन विनेश काकडे यांनी केले तर आभार सतीश इंगोले यांनी मानले. कार्यक्रमादरम्यान दीपक भांडेकर यांनी भजन सादर केले. कार्यक्रमाला आर्वीचे तहसीलदार विद्यासागर चव्हाण, आर्वीचे गटविकास अधिकारी अनिल गावंडे, कारंजाचे प्रवीण देशमुख, ठाणेदार संतोष शेगावकर, खरांगण्याचे वनपरिक्षेत्रधिकारी डी.एस.गजभे, उपविभागीय जलसंधारण अभियंता सुदेश ससाणे, जि. प. च्या माजी सदस्य राजश्री राठी, खरांगणा येथील सरपंच निलीमा अक्कलवार, राजू राठी, मिलींद भगत, एस.एन. जुडे यांच्यासह विविध गावांतील सरपंच, नागरिकांची उपस्थिती होती.
News - Wardha