महत्वाच्या बातम्या

 नालेसफाईच्या वादातून वृद्धाची दगडाने ठेचून हत्या : आरोपीला तासाभरात अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील शेगाव बु. येथील आष्टा बायपास रोड परिसरात नालेसफाईच्या कामादरम्यान झालेल्या क्षुल्लक वादातून एका ६५ वर्षीय वृद्धाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली. या प्रकरणी शेगाव पोलिसांनी तत्पर कारवाई करत अवघ्या एका तासाच्या आत आरोपीला अटक केली.

मृत व्यक्तीचे नाव विश्वनाथ परसराम कामडी (वय ६५), रा. मठ वार्ड, शेगाव बु.असे असून आरोपी महेंद्र रमेश भुरे (वय ३६), रा. दहेगाव जोशी, ता. पारशिवनी, जि. नागपूर) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेगाव बु. येथे ग्रामपंचायतीमार्फत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामासाठी बाहेरगावाहून मजूर आणण्यात आले होते. मंगळवारी सकाळी काम सुरू असताना दोन मजुरांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद मिटविण्यासाठी गेलेल्या विश्वनाथ कामडी यांच्यावर आरोपी महेंद्र भुरे याने संतापाच्या भरात जवळील दगड उचलून डोक्यावर वार केला. गंभीर दुखापत झाल्याने कामडी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त नागरिकांनी त्याचा पाठलाग केला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि शोधमोहीम राबवून आरोपीला एका तासाच्या आत अटक केली.

या प्रकरणी मृतकाची मुलगी ज्योती विलास सोनुने (वय ३४) यांनी शेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, त्यांचे वडील सकाळी घरातून फिरण्यासाठी बाहेर गेले होते. त्यानंतर गावातील लोकांनी नालेसफाईच्या कामासाठी आलेल्या व्यक्तीने दगडाने ठेचून हत्या केल्याची माहिती दिली. घटनास्थळी गेल्यानंतर विश्वनाथ कामडी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले.

प्राथमिक तपासात आरोपी महेंद्र भुरे हा नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असून नालेसफाईच्या कामासाठी शेगाव येथे आला होता. मात्र संबंधित ठेकेदाराकडे कामावर असलेल्या मजुरांची अधिकृत नोंद नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos