उप पोलीस स्टेशन लाहेरी येथे भारतीय संविधान दिन साजरा
- लाहेरी पोलिसांनी घेतली भारतीय संविधान दिनी शपथ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. भारत सरकारने आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला. संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ला आदेश काढून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.
याचेच औचित्य साधून उप पोलीस स्टेशन लाहेरी येथे संविधान दिन साजरा करण्यात आला तसेच 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे दहशतवादी हल्ल्यामध्ये देशासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनापुरे तसेच सीआरपीएफ बटालियन 37 चे असिस्टंट कमांडंट कैलास स्वागत व उप पोलीस स्टेशन लाहिरीचे प्रभारी अधिकारी महादेव भालेराव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर प्रभारी अधिकारी महादेव भालेराव यांनी संविधानाबाबत जनजागृती व्हावी
आणि संविधानाबाबत जनतेमध्ये आदर निर्माण व्हावा तसेच आपले मूलभूत हक्क आणि कर्तव्य याची जाणीव नागरिकांमध्ये व्हावी याबाबत मार्गदर्शन केले तसेच पोलीस उपनिरीक्षक प्रशांत डगवार यांनी भारतीय संविधान व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनापुरे यांनी सुद्धा उपस्थित सर्वांना भारतीय संविधान दिनाचे महत्त्व सांगून संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सीआरपीएफ बटालियन 37 चे असिस्टंट कमांडंट स्वागत कैलास यांनी उपस्थित सर्वांना संविधान दिनाची शपथ देऊन सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाच्या शेवटी 26 11 मुंबई वरील दहशतवादी हल्ला यास आज 14 वर्षे पूर्ण होत आहे त्या अनुषंगाने सर्व शहीद वीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता पोलीस उपनिरीक्षक प्रशांत डगवार सचिन सरकटे, नवनाथ पाटील तसेच पोलीस हवालदार राजेंद्र भांडेकर सखाराम शेडमाके मपोशी रेशमा गेडा, रत्नमाला जुमनाके, चंदा गेडाम, वृषाली चव्हाण, प्रमिला तुलावी, पोलीस शिपाई गुगलू तीम्मा, भूषण गलगट, मस्के, व एस आर पी एफचे पोलीस उपनिरीक्षक पाटील व अंमलदार यांनी सहकार्य केले.
News - Gadchiroli