नागपुरातील घटना : नगरसेविकेने तरुणाला दिली भयंकर शिक्षा, होम थिएटरचा आवाज वाढवून बेदम मारहाण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
नागपुरातील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दत्तवाडी याठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. दत्तवाडीतील शिवशक्ती नगरमधील माजी महिला नगरसेविकेने आणि तिच्या पतीने एका तरुणाला बेदम मारहाण केली. मारहाण केल्याचा आवाज शेजारील लोकांना जाऊ नये, म्हणून आरोपींनी घरातील साऊंड सिस्टीमचा आवाज वाढवून पीडित तरुणाला मारहाण केली आहे. या घटनेत पीडित तरुणानं कसाबसा आपला जीव वाचवून घरातून पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे. याप्रकरणी नागपुरातील वाडी पोलीस ठाण्यात एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
करण डोर्ले असे मारहाण झालेल्या 17 वर्षीय तरुणाचे नाव असून तो नागपुरातील शिवशक्ती नगरमधील रहिवासी आहे. त्याचे वडील CRPF चे जवान असून सध्या आपल्या कर्तव्यावर आहेत. दरम्यान, शुक्रवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी करण सकाळी साढेसात ते 8 च्या सुमारास दुकानात ब्रेड आणण्यासाठी गेला होता. त्याचवेळी आरोपी नगरसेविका सरिता यादव यांच्या मोठ्या मुलीने करणाला घरी बोलवले.
काहीतरी काम असेल असे समजून करणही घरात गेला. पण करण घरात जाताच संबंधित मुलीने घराचा दरवाजा बंद करत आपल्या आई वडिलांना बोलवले. यानंतर अल्पवयीन मुलीला बोलतो, या कारणातून यादव कुटुंबान करणला बेदम मारहाण केली आहे. घरात करणला मारल्याचा आवाज शेजारच्यांना ऐकू जाऊ नये म्हणून आरोपींनी घरातील होम थिएटरचा आवाज वाढवून ही मारहाण केली आहे.
करणने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी नगरसेविका सरिता यादव, तिचा नवरा आणि तिची मोठी मुलगी यांच्यासह अन्य तीन युवकांनी त्याला बेदम मारहाण केली आहे. अन्य तिघांनी तोंडाला स्कार्फ गुंडाळल्याने पीडित तरुणाला त्यांची ओळख पटवता आली नाही. ही मारहाण इतकी भयंकर होती की करणच्या शरीरावर अनेक ठिकाणी जबरी जखमा झाल्या आहेत. त्याला गळ्यावर, पाठीवर, पायांवर लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली आहे. आरोपींनी त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने घरात बोलवले होते. आरोपीची मोठी मुलगी चाकू घेऊन येईपर्यंत करणने घरातून पळ काढला. त्यामुळे त्याचा जीव वाचला आहे.
आरोपी नगरसेविकेच्या अल्पवयीन मुलीसोबत करण फोनवर बोलतो म्हणून त्याला ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान तुमची मुलगीच माझ्याशी बोलते, असे सांगून करण आरोपींना मोबाईलमधील पुरावा दाखवला असता, आरोपींनी त्याचा फोनही तोडून टाकला आहे. याप्रकरणी वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
  Print


News - Nagpur | Posted : 2021-09-14


Related Photos