बल्लारपूरात एका दिवसात तीन मृत्यूच्या घटना : दोन आत्महत्या,तर महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर शहरात रविवारी घडलेल्या तीन वेगवेगळ्या मृत्यूच्या घटनांनी परिसरात खळबळ उडाली आहे. दोन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असून एका महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. तिन्ही घटनांप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहेत.
पहिली घटना बल्लारपूरातील रविंद्र नगर वार्ड येथे घडली. गणेश शालिकराम डोंगरे (८५) यांनी रविवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी चहा घेतल्यानंतर ते घरात बसून होते. मात्र सकाळी ९ ते ९.३० वाजताच्या दरम्यान त्यांनी गळफास घेतल्याचे समोर आले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. गणेश डोंगरे हे मुरमुरे विक्रीचा व्यवसाय करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी तसेच नातवंडे असा परिवार आहे.
दुसरी घटना संतोषी माता वॉर्ड येथे घडली. रोशन रामधिन बहुरिया ( ४०) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी १२ ते १२.३० वाजताच्या सुमारास ते पत्नी व दोन मुलींसोबत बोलत होते. त्यानंतर ते दुसऱ्या खोलीत गेले. काही वेळानंतर आवाज आल्याने पत्नीने पाहणी केली असता ते गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. रोशन बहुरिया यांना दारूचे व्यसन असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, १० वर्षीय मुलगी व ८ वर्षीय मुलगी असा परिवार आहे.
तिसरी घटना बल्लारपूर शहरातील फुलसिंह नाईक वार्डात विजेचा धक्का लागून माया शंकर नेवारे ( ४६) या महिलेचा मृत्यू झाला. त्यांच्या घराच्या अंगणावरून ६६ केव्हीची वीजवाहिनी गेल्याची माहिती आहे. शनिवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास त्यांचा जावई त्यांना डबा देण्यासाठी घरी गेला होता. मात्र आवाज देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने त्या बाहेर गेल्या असाव्यात असे समजून तो परतला. रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास नात घरी गेली असता माया नेवारे या अंगणात पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. मृत माया नेवारे यांच्या पश्चात चार मुली व एक मुलगा असा परिवार आहे. मुलगा बाहेरगावी कामानिमित्त गेला असल्याचे सांगण्यात आले.
तिन्ही घटनांमध्ये पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, पोहवा दिनकर धोबे, पोहवा विशाल बेझलवार, पोअं नरेंद्र वाकडे, मपोअं कल्याणी पाटील करीत आहे.
News - Chandrapur




Petrol Price




