महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाहीत थरारक घटना: T-84 वाघीणीचा हल्ला; वनरक्षक गंभीर जखमी, वाघीणीचा गूढ मृत्यू



विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

जिल्हा प्रतिनिधी / चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील नाचणभट्टी बिट अंतर्गत रत्नापूर शेतशिवारात रविवारी (दि. 26 एप्रिल) दुपारी एक धक्कादायक घटना घडली. T-84 वाघीणीने अचानक हल्ला करून वनरक्षकाला गंभीर जखमी केले. विशेष म्हणजे, हल्ल्यानंतर काही वेळातच वाघीण मृत अवस्थेत आढळल्याने या प्रकरणाला गूढ वळण मिळाले आहे.

माहितीनुसार, ब्रम्हपुरी वनविभागाच्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील नवरगाव उपक्षेत्रात ही वाघीण काही दिवसांपासून फिरत होती. काही दिवसांपूर्वी तिने एका बैलाचा बळी घेतल्याने परिसरात आधीच भीतीचे वातावरण होते.

रविवारी दुपारी सुमारे 12.30 वाजता मक्याच्या शेतात वाघीण दिसल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी जमले. गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी वनविभागाचे पथक आले असताना, दबा धरून बसलेल्या वाघीणीने अचानक हल्ला केला.

या हल्ल्यात वनरक्षक सजन महादेव पारेकर (वय 42, रा. नवरगाव) गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

हल्ल्यानंतर वाघीण पुन्हा शेतात गेली; मात्र दुपारी सुमारे 1 वाजता ती मृत अवस्थेत आढळली. वाघीणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नैसर्गिक कारण, अंतर्गत जखमा किंवा मानवी हस्तक्षेप अशा विविध शक्यतांवर तपास सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, NTCA नागपूरचे प्रतिनिधी आणि इतर संबंधित घटनास्थळी दाखल झाले. वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली बोरावार यांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, वाघीणीचे वय सुमारे 9 ते 10 वर्षे होते. पशुवैद्यकीय पथकाने शवविच्छेदन करून विसेरा नमुने तपासणीसाठी जतन केले असून, त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मानव-वन्यजीव संघर्षाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.






  Print






News - Chandrapur




Related Photos