महत्वाच्या बातम्या

 सावली तालुक्यात वाघाचा पुन्हा बळी : गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याचा मृत्यू


महिनाभरापूर्वी हत्तीच्या हल्ल्याने हादरलेल्या परिसरात पुन्हा वन्यप्राण्याचा हल्ला : ग्रामस्थांमध्ये भीती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : सावली तालुक्यातील सामदा–सोनापूर मार्गावरील वाघोबा देवस्थानाजवळील संरक्षित वन क्षेत्रात शनिवारी दुपारी वाघाच्या हल्ल्यात एका गुराख्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. महिनाभरापूर्वी याच परिसरात टस्कर हत्तीच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या भागात वन्यजीवांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिक गडद झाले आहे.

हिरामण मारखंडी साखरे ६५  रा. सामदा बु. असे मृत गुराख्याचे नाव आहे. ते नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी जंगलालगतच्या परिसरात गेले होते. दुपारी सुमारे १.३० वाजताच्या सुमारास संरक्षित वन कक्ष क्रमांक १५०१ च्या सीमेवर गुरांवर लक्ष ठेवत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढविला. हल्ला इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. तसेच परिसरात वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अतिरिक्त गस्त सुरू करण्यात आली आहे.

वन विभागाने जंगलालगतच्या गावांतील नागरिक, शेतकरी आणि गुराख्यांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. जंगलाच्या सीमेलगत एकट्याने न जाणे, गुरे चारताना समूहाने जाणे आणि वन्यप्राण्यांचा वावर आढळल्यास तात्काळ वन विभागाला माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

दरम्यान, याच परिसरात काही आठवड्यांपूर्वी भरकटलेल्या टस्कर हत्तीच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता वाघाच्या हल्ल्यात आणखी एक जीव गेल्याने सामदा, सोनापूर व परिसरातील गावांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वन्यजीव–मानव संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून, अशा घटना रोखण्यासाठी वन विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, जंगलालगतच्या गावांमध्ये सतर्कता यंत्रणा उभारावी आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.






  Print






News - Gadchiroli




Related Photos