महत्वाच्या बातम्या

 शिक्षक पदोन्नतीसाठी सेवाज्येष्ठतेलाच प्राधान्य : ३१ ऑगस्टपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे शासनाचे आदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / कोल्हापूर : टीईटी, सीईटी उत्तीर्ण असण्याबरोबरच सेवाप्रवेश, नियमानुसार आवश्यक अनुभव आणि इतर विहित अर्हता धारण करणाऱ्या शिक्षकांना सेवाज्येष्ठतेच्या आधारे पदोन्नती देण्याचे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने बुधवारी जारी केले आहेत. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी पदोन्नती प्रक्रिया ३१ ऑगस्ट २०२६ पूर्वी पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत.

शिक्षक संघटनांनी सेवाज्येष्ठतेला डावलून पदोन्नती होत असल्याच्या विरोधात राज्यभर आंदोलन छेडले होते. त्याचबरोबर न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचा विचार करून शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पदोन्नती प्रक्रियेत काही त्रुटी राहिल्या असल्यास किंवा प्रक्रिया अपूर्ण असेल तर ती नव्याने राबविण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत.

या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेमधील केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आणि मुख्याध्यापक पदांच्या पदोन्नतीची प्रक्रिया नव्याने पार पडणार आहे. मात्र, स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्त झालेल्या केंद्रप्रमुखांना या निर्णयातून वगळण्यात आले आहे.

१० जुलैपूर्वीच्या पदोन्नत्यांना संरक्षण - 

शासन आदेशानुसार, १० जुलै २०२६ पूर्वी ज्या जिल्हा परिषदांमध्ये पदोन्नती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्ती आदेश निर्गमित झाले आहेत, त्या पदोन्नत्यांना संरक्षण देण्यात आले आहे. ज्या ठिकाणी नियुक्ती आदेश जारी झाले आहेत, तेथे पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाल्याचे मानले जाणार आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात प्रक्रिया पूर्ण न झाल्याने येथील पदोन्नती प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार आहे.

राज्यभर एकसमान कार्यपद्धती - 
पदोन्नती प्रक्रियेत राज्यभर एकसमानता राहावी यासाठी शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट कार्यपद्धती निश्चित केली आहे.

चालू वर्षासाठीचे निर्देश -
ऑगस्ट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात पदोन्नती समितीची बैठक घेण्यात यावी., बैठकीच्या दिनांकास संबंधित शिक्षकांचा सेवाकाल, टीईटी/सीईटीसह आवश्यक अर्हता विचारात घ्यावी.,पात्र उमेदवारांची पदोन्नतीसाठी शिफारस करावी., कोणत्याही परिस्थितीत ३१ ऑगस्टपूर्वी पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करून नियुक्ती आदेश निर्गमित करावेत., नियुक्ती आदेश जारी झाल्यानंतरच पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाल्याचे मानले जाईल. पुढील वर्षापासून नवे वेळापत्रक

शासनाने पुढील वर्षांपासून पदोन्नती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी नवीन वेळापत्रक निश्चित केले आहे. त्यानुसार प्रत्येक वर्षी १ जानेवारी रोजी सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्याची आवश्यकता नसल्यास त्याच दिवशी अंतिम सेवाज्येष्ठता यादी जाहीर केली जाईल.

शिक्षक संघटनांकडून स्वागत -

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. सेवाज्येष्ठता डावलून अन्यायकारक पद्धतीने पदोन्नती दिली जात असल्याच्या विरोधात राज्यभर उभारण्यात आलेल्या लढ्याला या शासन निर्णयामुळे मोठे बळ मिळाल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण करणारा हा निर्णय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.





  Print






News - Rajy




Related Photos