महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई : अवैध दारू व चारचाकीसह ५.९८ लाखांचा मुद्देमाल जप्त


- स्थानिक गुन्हे शाखा व रेपनपल्ली उपपोस्टे पोलिसांची संयुक्त धडक, तेलंगणातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यात दारूबंदी लागू असतानाही अवैधरीत्या विदेशी मद्याची वाहतूक करून चिल्लर विक्रेत्यांना पुरवठा करण्याचा प्रयत्न उधळून लावत गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि उपपोस्टे रेपनपल्ली पोलिसांच्या संयुक्त पथकाने सापळा रचून विदेशी मद्याचा साठा आणि त्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली चारचाकी जप्त केली. या कारवाईत एकूण ५ लाख ९८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून तेलंगणातील दोन आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार १९ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला एका गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, संदीप स्वामी गुराल्ला आणि त्याचा साथीदार सुरेंदर शंकर भुक्या (नायक) हे पांढऱ्या रंगाच्या फोर्ड इकोस्पोर्ट्स (क्रमांक : DL-२FBP-००४५) या वाहनातून रेपनपल्ली परिसरातील चिल्लर दारू विक्रेत्यांना विदेशी मद्याचा पुरवठा करण्यासाठी येत आहेत.

मिळालेल्या माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखा व रेपनपल्ली उपपोस्टे पोलिसांनी मौजा रेपनपल्ली येथे सापळा रचला. काही वेळातच संशयित वाहन घटनास्थळी येताना दिसताच पोलिसांनी रस्त्यावर तात्पुरता अडथळा निर्माण करून वाहन थांबविले. वाहनातील दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांनी आपली नावे सुरेंदर शंकर भुक्या (नायक), ३८ वर्ष  रा. सुभाषनगर, नसपूर, जि. मंचेरियल (तेलंगणा) आणि संदीप स्वामी गुराल्ला, ३१ वर्ष  रा. करमपल्ली, ता. चेन्नूर, जि. मंचेरियल (तेलंगणा) अशी सांगितली.

पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये ऑफिसर्स चॉईस व्हिस्कीच्या ७५० मिली क्षमतेच्या ८९ प्लास्टिक बाटल्या, अंदाजे ८९ हजार रुपये किमतीच्या, तसेच किंगफिशर स्ट्राँगच्या ७५० मिली क्षमतेच्या ३१ काचेच्या बाटल्या, अंदाजे ९ हजार ३०० रुपये किमतीच्या आढळून आल्या. याशिवाय अवैध दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली फोर्ड इकोस्पोर्ट्स कार, अंदाजे ५ लाख रुपये किमतीची जप्त करण्यात आली. अशाप्रकारे पोलिसांनी ५ लाख ९८ हजार ३०० रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी उपपोस्टे रेपनपल्ली येथे दाखल तक्रारीवरून अपराध क्रमांक ३६/२०२६ नोंद करण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) व ८३ अन्वये दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रेपनपल्ली पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी हर्षवर्धन बी. जे., तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, जिमलगट्टा राहुल मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली आणि उपपोस्टे रेपनपल्ली येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधातील अशा कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos