महत्वाच्या बातम्या

 महाविद्यालयीन परिसर अमली पदार्थमुक्त करण्यासाठी पोलीस - प्राचार्यांची संयुक्त बैठक


- विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती, समुपदेशन आणि हॉटस्पॉट्सवर कडक कारवाईचा निर्धार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील महाविद्यालयीन परिसरातून अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस प्रशासनाच्या पुढाकारातून जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची संयुक्त बैठक पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त ठेवण्यासाठी जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि सर्व विभागांच्या समन्वयातून प्रभावी कृती आराखडा राबविण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीच्या प्रारंभी उपस्थित सर्व प्राचार्यांना सुरक्षा मंत्र पुस्तिकेचे वितरण करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या व्यसनाधीनतेच्या पार्श्वभूमीवर नियमित जनजागृती अभियान, समुपदेशन शिबिरे, मार्गदर्शन कार्यक्रम आणि पालकांच्या सहभागातून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात आला.

महाविद्यालय परिसरासह जिल्ह्यातील अमली पदार्थांची खरेदी-विक्री होत असल्याचा संशय असलेल्या ठिकाणांची (हॉटस्पॉट्स) ओळख पटवून तेथे तातडीने आणि कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अशा ठिकाणांवर सातत्याने पोलीस गस्त, गुप्त माहिती संकलन आणि विशेष मोहिमा राबविण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

 यावेळी विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांमधील व्यसनाधीनतेची सुरुवातीची लक्षणे ओळखणे, संशयित विद्यार्थ्यांना योग्य वेळी समुपदेशन उपलब्ध करून देणे तसेच पालक आणि शिक्षक यांच्यात समन्वय वाढविण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि शैक्षणिक संस्थांनी संयुक्तपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या अमली पदार्थांच्या माफियांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले. या मोहिमेत सर्व महाविद्यालये, प्राध्यापक, पालक आणि समाजातील विविध घटकांनी सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीस पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, भरोसा सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा वाडेकर, दामिनी पथक व सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे ५२ प्राचार्य उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos