महत्वाच्या बातम्या

 ट्रकसह २१ लाखांच्या गॅस सिलिंडर चोरीप्रकरणाचा पर्दाफाश : एलसीबीकडून ३ आरोपी निष्पन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : पडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी खुटाळा परिसरातून ट्रकसह २१ लाखांहून अधिक किमतीचे एचपी गॅस सिलिंडर चोरीला गेल्याच्या गाजलेल्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) यशस्वी उलगडा केला आहे. या प्रकरणात तीन आरोपींचा सहभाग निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आले असून, त्यांच्या ताब्यातून चोरीतील बहुतांश मुद्देमाल तसेच सिलिंडर विकून मिळालेली रोकड जप्त करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैभव विनोद खांडरे ४२ वर्ष रा. समाधी वॉर्ड, जेल रोड, चंद्रपूर) हे गॅस सिलिंडर वाहतूक व्यवसाय करतात. १२ जुलै २०२६ रोजी एमआयडीसी खुटाळा येथील गॅस बॉटलिंग प्लांटसमोरील रस्त्यावर उभा असलेला अशोक लेलंड कंपनीचा ट्रक क्र. एमएच-३४ बीजी-१६०० अज्ञात चोरट्यांनी पळवून नेला होता. ट्रकमध्ये ३३२ घरगुती आणि १० व्यावसायिक (कमर्शियल) एचपी गॅस सिलिंडर भरलेले होते. ट्रकसह चोरीस गेलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २१ लाख १४ हजार रुपये होती. याप्रकरणी पडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा आणि पडोली पोलिसांनी संयुक्तपणे तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि विविध पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी राजेंद्र रामचंद्र काळे वय ३२ वर्ष रा. बांढरी फाटा, पडोली,  कुणाल सुभाष घुरुडे वय २० वर्ष  रा. म्हाडा कॉलनी, दातळा, चंद्रपूरआणि मोहित पोतदार रा. मुलचेरा, जि. गडचिरोली या तिघांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न केला.

आरोपींना ताब्यात घेऊन केलेल्या सखोल चौकशीत चोरीतील बहुतांश मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. आरोपींकडून ८२ भरलेले घरगुती एचपी गॅस सिलिंडर, २५० रिकामे घरगुती सिलिंडर, १० भरलेले कमर्शियल सिलिंडर तसेच चोरीचे सिलिंडर विकून मिळालेली २ लाख ४७ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि. योगेश हिवसे सपोनि. दीपक काँक्रेडवार पोउनि. विनोद भुरले, पोउनि. सुनील गौरकार, पोउनि. देवानंद कैकान (पडोली पोलीस स्टेशन), तसेच पोहवा सुभाष गोहोकार, सतीश अवधरे, रजनिकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इमान खान, शरद कुडे, पोअं. हिरालाल गुप्ता, संदीप कांबडी, किशोर वाकाटे आणि शशांक बदामवार यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos