बालेवाडी पुणे येथे नैसर्गिक शेती विषयी कार्यशाळा ६ ऑक्टोबर रोजी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : कृषी विभागामार्फत 06 ऑक्टोबर 2022 रोजी बालेवाडी, क्रिडा संकुल, पुणे येथे नैसर्गिक शेती विषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत गुजरात राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील कृषीमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे व इतर मान्यवर हे उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेतीला देशात प्रोत्साहन देणे,रासायनिक खतांच्या मुख्यत: युरीयाचा वापर कमी करणे यावर भर देण्याचे निर्देश दिलेले आहेत. या दृष्टीने गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी कुरुक्षेत्र हरियाणा येथे केलेले नैसर्गिक शेतीचे प्रयोग आणि गुजरात राज्यात केलेला प्रसार याबाबत मार्गदर्शन मिळणार आहे. आचार्य देवव्रत यांनी कुरुक्षेत्र येथील गुरुकुलाची सुमारे 200 एकर शेती पुर्णत: नैसर्गिक शेतीमध्ये कशी परीवर्तीत केली आणि भविष्यात हा शाश्वत शेतीचा पर्याय कसा होऊ शकतो याबद्दल त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
राज्यभरातून सुमारे 2000 शेतकरी या कार्यशाळेस उपस्थित राहतील. दुपारच्या तांत्रिक सत्रात तज्ञांचे मार्गदर्शन तसेच महाराष्ट्रात नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव कथन ऐकायला मिळणार आहे. या कार्यशाळेला जोडून नैसर्गिक शेतीबाबतच्या एका प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. सदरकार्यशाळेचे थेट प्रक्षेपण कृषि विभागाच्या युट्युब चॅनलवर https://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM करण्यात येणार आहे. तसेच सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणाची व्यवस्था ग्रामपंचायत कार्यालय, शासकीय कार्यालये, कृषि विज्ञान केंद्र, कृषि संशोधन संस्था इ. ठिकाणी करण्यात येणार आहे.
अन्नधान्याच्या आणि संकरित वाणाच्या तसेच इतर पिकांच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खते, किटकनाशके, बुरशीनाशके आणि तणनाशकाचा मोठ्या प्रमाणात असंतुलितव अमर्याद वापर होत असुन पाण्याचा जास्त वापर, जमिनीची धुप होणे,सेंद्रिय खतांचा कमी वापर अथवा अजिबात वापर न करणे, एकच पीक वारंवार घेणे इत्यादी कारणांमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडून जमिनीतील जैविक घटकाचा विनाश झाल्याने जमिनी मृत होत चालल्या असून कडक होत आहेत. रासायनिक शेतीमध्ये शेतकऱ्यांना रसायने आणि विविध किटकनाशकांची हाताळणी दररोज करावी लागत असल्याने आरोग्यविषयक समस्येस सामोरे जावे लागत आहे.परीणामस्वरुप मानवी व पशुपक्षी यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
सद्यस्थितीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध असलेले नैसर्गिक व जैविक शेतीचे विविध मॉडेल्स हे पर्यावरणीय आणि आर्थिक दृष्ट्या शाश्वत पिक उत्पादनाची खात्री देणारे असुन या सर्व पध्दती प्राचीन भारतीय तत्वज्ञान आणि आधुनिक वैज्ञानिक ज्ञानावर आधारीत आहेत. नैसर्गिक व जैविक शेतीमुळे अधिक पोषक व सुरक्षित अन्न मिळत असल्यामुळे ग्राहकांचा यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. नैसर्गिक शेती पध्दतीने पिकविलेल्या सुरक्षित अन्नामुळे मानवी शरीरावर होणाऱ्या आरोग्याच्या फायद्यामुळे सदर अन्नपदार्थांची मागणी मोठया प्रमाणात वाढत आहे. या कार्यशाळेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असेआवाहन कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे.
News - Gadchiroli