सोयाबीन बियाण्यांची उगवणक्षमता तपासणी करूनच पेरणी करावी


- कृषि विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन
- उगवनक्षमता तपासण्याचे तीन पर्याय
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : एकदा शेतात पेरलेले बियाणे न उगविल्यास शेतकऱ्यांना फार मोठ्या आर्थिक त्रासाला समोर जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या हंगामात सोयाबीनची पेरणी करतांना आधी बियाण्यांची उगवनक्षमता तपासून घ्यावी आणि त्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मागील हंगामातील सोयाबीन शिल्लक असेल त्यांनी घरच्या सोयाबीनची उगवण क्षमता तपासणी करावी. ही तपासणी फार सोपी आहे. गोणपाट वापरून तपासणी करतांना बियाण्याच्या प्रत्येक पोत्यातून खोलवर हात घालून मूठभर धान्य बाहेर काढावे व ते एकत्र करावे, गोणपाटाचे ६ चौकोनी तुकडे घेऊन स्वच्छ धुऊन घ्यावे, पोत्यातून काढलेल्या धान्यातून सरसकट १०० दाणे मोजून दीड ते दोन सेंटीमीटर अंतरावर १०, १० च्या रांगेत गोणपाटाच्या एका तुकड्यावर ओळीत ठेवावे, अशा प्रकारे १०० दाण्यांचे तीन नमुने तयार करावे, गोणपाटावर चांगले पाणी शिंपडून ओले करावे.
बियाण्यांवर दुसऱ्या गोणपाटाचा तुकडा अंथरूण पुन्हा चांगले पाणी मारावे, गोणपाटाच्या तुकड्याची बियाण्यांसकट गुंडाळी करून थंड ठिकाणी सावलीत ठेवा, त्यावर अधून मधून पाणी शिंपडून ओले ठेवावे, सहा सात दिवसानंतर ही गुंडाळी उघडावी. चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करा व मोजावे तीनही गुंडाळ्याची सरासरी काढून १०० पैकी ७० किंवा त्यापेक्षा जास्त दाणे जर कोंब आलेले असतील तर बियाणे बाजारातील बियाणे सारखेच गुणवत्तेचे आहे, असे समजावे. जर उगवण झालेल्या बियाण्याची सरासरी संख्या ७० पेक्षा कमी असेल तर एकरी बियाण्यांचे प्रमाण थोडे वाढवून पेरणी करावे. पेरणी करतांना बियाण्यास बुरशीनाशकांची व जिवाणू संवर्धकांची प्रक्रिया करावी.
वर्तमानपत्राचा कागद वापरून उगवणक्षमता तपासायची असल्यास वर्तमानपत्राचा एक कागद घेऊन त्याच्या चार घड्या पाडाव्यात. नंतर तो पूर्ण कागद पाण्याने ओला करावा, प्रत्येकी दहा बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून वर्तमानपत्राच्या टोकाच्या भागावर ठेवून त्याची गुंडाळी करावी. अशारितीने शंभर बियांच्या दहा गुंडाळ्या कराव्यात. त्या गुंडाळ्या पॉलिथिन पिशवीत चार दिवस ठेवाव्यात. त्यानंतर त्यामधील अंकुर मोजावे.
बियाणे पाण्यात भिजवून कमी वेळेत देखील उगवनक्षमता तपासता येते. पोत्यातून काढलेले धान्य एकत्र करून घ्या. त्या नमुन्यात १०० दाणे मोजून वेगळे काढा. असे १०० दाण्यांचे ३ संच तयार करा. शक्यतो काचेच्या ३ ग्लासात पाणी घेऊन त्यात हे दाणे टाकावे. ५ ते ६ मिनिटे तसेच राहू द्यावे. त्यानंतर पाणी फेकून देऊन दाणे वेगळे काढा व त्यामधील पूर्णतः फुगलेले तसेच बियाण्याच्या टरफलावर सुरकुत्या पडलेले दाणे वेगळे करावे. दोन्ही प्रकारच्या दाण्यांची संख्या मोजून घ्यावी. जो दाणा ५ ते ६ मिनिटे पाण्यात ठेवल्यानंतर चांगला टम्म फुगतो तो पेरणीसाठी अयोग्य असतो. मात्र जे बियाणे चांगले असते त्याचे टरफल शाबूत असल्यामुळे त्याच्यात पाणी आत शिरत नाही. फक्त टरफलातून पाणी आत गेल्यामुळे त्यावर सुरकुत्या पडल्या सारखे दिसते. १०० दाण्यापैकी जर सरासरी ७० किंवा जास्त दाणे अशाप्रकारे न फुगलेले, सुरकुत्या न पडलेले असेल तर बियाणे बाजारातील बियाण्यांसारखेच गुणवत्तेचे आहे, असे समजावे, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.
News - Wardha