महत्वाच्या बातम्या

 संत्रानगरीचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दर्शन घडवूया : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 


- जी-20 बैठकीच्या पूर्वतयारीचा घेतला आढावा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर :
नागपुरात येत्या 21 आणि 22 मार्च रोजी होणाऱ्या जी- 20 गटाच्या बैठकीत संत्रानगरीचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दर्शन मान्यवरांना घडवुया. तसेच संत्रानगरीला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून जगापुढे आणूया, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात जी- 20 परिषदेच्या शहरात आयोजित होणाऱ्या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सौम्या शर्मा, जिल्हा पोलिस अधीक्षक (ग्रामीण) विशाल आनंद, अपर जिल्हाधिकारी आशा पठाण यांच्यासह महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यासचे वरिष्ठ अधिकारी, शहरातील विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

मान्यवरांचे आगमन, जी- 20 साठी आवश्यक जनजागृती, बैठकांचा कार्यक्रम तसेच तयारीच्या अनुषंगाने राबविण्यात येणारे विविध उपक्रम याविषयीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत घेतला व संबंधितांना सूचना केल्या. शहरात बैठकीसाठी सहभागी होणाऱ्या मान्यवरांचे स्वागत हे सूताचा हार आणि उपरणे देऊन करण्यात येणार आहे. नागपूरच्या विविध संस्कृतींचे दर्शन त्यांना या परिषदे दरम्यान घडविण्यात येणार आहे. शहराचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा या परिषदेच्या माध्यमातून पुढे आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पर्यटन स्थळांमध्ये दीक्षाभूमी, पेंच राष्ट्रीय उद्यान, ड्रॅगन पॅलेस कामठी या प्रमुख स्थळांचे दर्शन घडविण्यात येणार आहे. नागपूर शहरामध्ये 21 व 22 मार्च रोजी जी-20 समूहातील देशातील सिव्हिल सोसायटीचे सदस्य येणार आहेत.

जी- 20 मध्ये सहभागी असणारे देश व तेथील विविध शिष्टमंडळ वेगवेगळ्या बारा मुद्यांवर भारतातील विविध शहरांमध्ये बैठका घेत आहे. एका वर्षाच्या कालावधीमध्ये या बैठका होत आहेत. जी-20 चे यजमानपद भारताला मिळाल्यानंतर या बैठकीची सुरुवात झाली. नागपूर येथे होणारी जी-20 ही सिव्हिल सोसायटीच्या संदर्भात जागतिक स्तरावरील ध्येयधोरण ठरवणार आहे. त्यामुळे जी-20 बैठकीला सी-20 असे देखील म्हटले जाते. मुंबई येथे यापूर्वी झालेली बैठक ही व्यापारांची बैठक होती. तर पुणे येथे नुकतीच झालेली बैठक ही अर्बन 20 या संदर्भातील होती.





  Print






News - Nagpur




Related Photos