महत्वाच्या बातम्या

 डॉक्टरच्या फ्लॅटचे कुलूप तोडून ३.४० लाखांचा ऐवज लंपास


- लक्ष्मीनगरातील घटना , सोन्या-चांदीचे दागिने आणि मोत्यांचा संच चोरीला, रामनगर पोलिसांत गुन्हा दाखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : फ्लॅटला कुलूप लावून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कर्तव्यावर गेलेल्या डॉक्टरच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि मोत्यांचा संच असा एकूण ३ लाख ४० हजार ७०० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी गोंदियातील लक्ष्मीनगर परिसरात उघडकीस आली. डॉ. संदीप वसंतराव आंबेडकर (४४) हे मूळचे नरसाळा, नागपूर येथील रहिवासी असून सध्या गोंदियातील लक्ष्मीनगर परिसरातील न्यू लक्ष्मी बिल्डिंगमध्ये वास्तव्यास आहेत. ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ११ वाजता डॉ. आंबेडकर हे आपल्या फ्लॅटला कुलूप लावून नेहमीप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कर्तव्यावर गेले होते. दिवसभराची ड्युटी आटोपून ते रात्री सुमारे ११.४५ वाजता घरी परतले. त्यावेळी फ्लॅटच्या मुख्य दरवाजाच्या कुलूपाचा कोंडा तुटलेल्या अवस्थेत दिसून आला. घरात चोरी झाल्याचा संशय आल्याने त्यांनी आत जाऊन पाहणी केली. त्यावेळी बेडरूममधील अलमारीचे लॉकही तोडण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अलमारीची तपासणी केली असता त्यामध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि मोत्यांचा संच गायब असल्याचे आढळून आले. चोरट्यांनी ३ लाख १८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, १२ हजार ७०० रुपयांचे चांदीचे दागिने आणि १० हजार रुपये किमतीचा मोत्यांचा संच असा एकूण ३ लाख ४० हजार ७०० रुपयांचा ऐवज लंपास केला.

पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू -

या घटनेनंतर डॉ. आंबेडकर यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३) आणि ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक तिरुपती अशोक राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक दीपक ठाकरे पुढील तपास करीत आहेत. चोरट्यांनी घराची पाहणी कधी केली, चोरी करण्यासाठी कोणत्या मार्गाचा वापर केला आणि या चोरीत आणखी कोणी सहभागी होते का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. लक्ष्मीनगरसारख्या वर्दळीच्या परिसरातील निवासी इमारतीत डॉक्टरच्या फ्लॅटचे कुलूप तोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याने परिसरातील नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे.





  Print






Related Photos