कष्टकरी हातांच्या सन्मानाने उजळली दिवाळी : नगरसेविका प्रियंका थुलकर यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिल्या भेटवस्तू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा आणि माणुसकी जपण्याचा सण. मात्र, आपल्या शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी स्वतःच्या आनंदाचा विचार न करता अहोरात्र राबणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातही दिवाळीचा आनंद फुलावा, या भावनेतून नगरसेविका कु. प्रियंका भारत थुलकर यांनी माणुसकीचा सुंदर उपक्रम राबविला.
प्रभाग क्रमांक ८ (अ) रविंद्र नगर वार्ड आणि प्रभाग क्रमांक ८ (ब) संतोषी माता वॉर्ड येथील स्वच्छता कर्मचारी व कामगार बंधू-भगिनींची भेट घेऊन त्यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत प्रियंका थुलकर यांनी त्यांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
शहरातील रस्ते, परिसर आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी हे कर्मचारी ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता आपले कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या श्रमामुळेच नागरिकांना स्वच्छ वातावरणात राहता येते. मात्र, अनेकदा त्यांच्या कष्टांची दखल घेतली जात नाही. हीच जाणीव मनात ठेवून त्यांच्या श्रमांचा सन्मान करण्याचा आणि सणाच्या आनंदात त्यांनाही सहभागी करून घेण्याचा हा छोटासा प्रयत्न करण्यात आला.
दिवाळीचा खरा आनंद केवळ घरात दिवे लावण्यात नसून, दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश निर्माण करण्यात आहे. आपल्या माणसांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य आणि त्यांच्या डोळ्यांतील समाधान हाच खरा सणाचा आनंद असल्याची भावना प्रियंका थुलकर यांनी व्यक्त केली. त्यांच्या या उपक्रमातून कष्टकरी हातांप्रती कृतज्ञता आणि माणुसकीचा दिवा उजळल्याचे चित्र पाहायला मिळाले.




Petrol Price




