महत्वाच्या बातम्या

 आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसाठी गडचिरोली पोलिसांचा भव्य जनजागरण मेळावा


- ८१९ माओवाद्यांचे आत्मसमर्पण; ३१३ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ 

- आधार, ई-श्रम, आयुष्यमान भारतसह विविध कार्डांचे वितरण 

- आरोग्य तपासणीसह रोजगार व कौशल्य विकासाची माहिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात माओवादाविरोधातील लढ्याला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर हिंसाचाराचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी झालेल्या आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या पुनर्वसनासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून प्रोजेक्ट संजीवनी अंतर्गत आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसाठी भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली १५ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे, तर १७ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस उप-मुख्यालय (प्राणहिता), अहेरी येथे हा जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला. सन २००५ पासून आत्मसमर्पण केलेल्या माओवादी सदस्यांच्या अडीअडचणी जाणून घेणे, त्यांच्या प्रलंबित समस्या सोडविणे आणि शासनाच्या विविध पुनर्वसन व कल्याणकारी योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविणे हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश होता.

८१८ माओवाद्यांचे आत्मसमर्पण -
गडचिरोली पोलीस दलाच्या पुनर्वसनाच्या प्रयत्नांमुळे आतापर्यंत एकूण ८१९ माओवाद्यांनी पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पणानंतर या सदस्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने आणि सुरक्षितपणे जीवन जगता यावे, यासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच रोजगार, स्वयंरोजगार आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे.

मेळाव्यात आत्मसमर्पित सदस्यांना विविध शासकीय पुनर्वसन योजना, रोजगाराच्या संधी, स्वयंरोजगारासाठी उपलब्ध सुविधा, कौशल्य विकास प्रशिक्षण आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित यंत्रणांमार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात आली.

३१३ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ -
या दोन्ही मेळाव्यांमध्ये आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसाठी विविध शासकीय कागदपत्रे व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली. यामध्ये आधार कार्ड, ई-श्रम कार्ड, महा सारथी कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड आणि आभा कार्ड काढून देण्यात आले. या कागदपत्रांचे मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले.

गडचिरोली आणि अहेरी येथे आयोजित या जनजागरण मेळाव्यांमध्ये एकूण ३१३ लाभार्थ्यांचे विविध शासकीय योजनांशी संबंधित दाखले व कागदपत्रे काढून देण्यात आली. याशिवाय पात्र आत्मसमर्पित सदस्यांना पुनर्वसन निधीचे धनादेशही पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

आरोग्य तपासणीसह विविध उपक्रम -
आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या आरोग्याचीही या मेळाव्यात विशेष काळजी घेण्यात आली. तज्ज्ञ वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून उपस्थित सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन आणि उपचाराबाबत माहिती देण्यात आली.

प्रोजेक्ट संजीवनीच्या माध्यमातून केवळ प्रशासकीय पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करण्याऐवजी आत्मसमर्पित सदस्यांना नवीन ओळख, आत्मविश्वास, कौशल्य आणि सन्मानाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे.

ऑपरेशन रोशनीअंतर्गत आरोग्य व मानसिक सक्षमीकरण -
आत्मसमर्पित सदस्यांच्या आरोग्य आणि शारीरिक क्षमतेकडेही विशेष लक्ष देण्यात आले आहे. ऑपरेशन रोशनी अंतर्गत नेत्रोपचार शिबिरे आयोजित करण्यात आली असून आवश्यक शस्त्रक्रियाही करण्यात आल्या आहेत. मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन, सामाजिक समावेशन आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ध्यान व योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

४६ आत्मसमर्पित माओवादी जोडप्यांचे सामूहिक विवाह -
पुनर्वसनाच्या व्यापक प्रक्रियेत सामाजिक पुनर्स्थापनेलाही महत्त्व देण्यात आले आहे. प्रोजेक्ट संजीवनीच्या माध्यमातून आतापर्यंत ४६ आत्मसमर्पित माओवादी जोडप्यांचे सामूहिक विवाह आयोजित करून त्यांना नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी मदत करण्यात आली आहे. याशिवाय ९६ आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीत कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आत्मनिर्भर बनून कुटुंबासोबत सुरक्षित जीवन जगा -
मेळाव्यात मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी आत्मसमर्पित सदस्यांना कौशल्याचा उपयोग करून आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट संजीवनीच्या माध्यमातून आत्मसमर्पित सदस्यांना आतापर्यंत विविध प्रकारची मदत देण्यात आली आहे. त्यांनी आपल्या कौशल्याचा उपयोग करून आत्मनिर्भर बनावे, कुटुंबासोबत सुरक्षित व सुखी जीवन जगावे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने पुढे जावे. आत्मसमर्पित सदस्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गडचिरोली पोलीस दल कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान -
या जनजागरण मेळाव्याच्या आयोजनासाठी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी हर्षवर्धन बी. जे., सहायक पोलीस अधीक्षक गडचिरोली अनिकेत हिरडे, सहायक पोलीस अधीक्षक भामरागड सागर भामरे, सहायक पोलीस अधीक्षक धानोरा सुयश कुमार सिंग, पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनील उईके, उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा प्रमोद मडामे, सिरोंचा समाधान पाटील, जिमलगट्टा राहुल मडावी आणि अहेरी हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पण शाखा गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पिवाल, पोलीस उपनिरीक्षक विक्रम बुरंगे, महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिक्षा राठोड तसेच पोलीस अंमलदारांनी परिश्रम घेतले.

गडचिरोली पोलीस दलाच्या या उपक्रमामुळे हिंसाचाराचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात परतलेल्या आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ, रोजगाराच्या संधी, आरोग्य सुविधा आणि सामाजिक आधार मिळण्यास मदत होत असून, त्यांच्या पुनर्वसन प्रक्रियेला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे.





  Print






Related Photos