महत्वाच्या बातम्या

 ग्रामीण महिलांच्या फराळाला बल्लारपुरात मिळाली बाजारपेठ : दिवाळी फराळ महोत्सव उत्साहात संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : दिवाळीच्या पावन पर्वावर ग्रामीण महिलांच्या मेहनतीला, कौशल्याला आणि उद्योजकतेला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पंचायत समिती बल्लारपूरच्या प्रांगणात उमेद अभियानांतर्गत भव्य दिवाळी फराळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन तहसीलदार रेणुका कोकाटे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

यावेळी उपविभागीय अधिकारी अर्जुन पावरा, गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. महोत्सवात ग्रामीण भागातील महिला बचतगटांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कोठारी येथील संजोग उत्पादक समूह, रमाई व निशा समूह, बामणी येथील समर्थ समूह तसेच विसापूर येथील वीरा समूहाने विविध खाद्यपदार्थ आणि आकर्षक सजावटीच्या वस्तूंचे स्टॉल लावले होते.

या स्टॉलवर महिलांनी स्वतः तयार केलेले पारंपरिक दिवाळी फराळ, लाडू, चकली, चिवडा यांसह विविध खाद्यपदार्थ आणि सजावटीच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. नागरिकांनीही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.

या महोत्सवातील विशेष बाब म्हणजे पंचायत समितीच्या सर्व विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महिला बचतगटांच्या स्टॉलवरून दिवाळी फराळ आणि सजावटीच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. प्रशासनाने दिलेल्या या प्रोत्साहनामुळे महिला बचतगटांचा उत्साह द्विगुणित झाला.

हा महोत्सव केवळ दिवाळी फराळाच्या विक्रीपुरता मर्यादित न राहता ग्रामीण महिलांच्या कष्टाला बाजारपेठ मिळवून देणारा आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला बळ देणारा उपक्रम ठरला. महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना थेट ग्राहक मिळाल्याने त्यांच्या कौशल्याला योग्य दाद मिळाली. उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना उद्योजकतेची नवी दिशा मिळत असून, अशा उपक्रमांमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास निश्चितच मदत होणार आहे.





  Print






Related Photos