महत्वाच्या बातम्या

 घरमालकाकडून तरुणीशी अश्लील चाळे : २० वर्षीय तरुणी भयभीत, ५९ वर्षीय वेकोलि कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी भाड्याने राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीच्या खोलीत अनधिकृतपणे प्रवेश करून अश्लील कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी ५९ वर्षीय घरमालक तथा वेकोलि कर्मचाऱ्याविरुद्ध दुर्गापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घरमालकाकडूनच असा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पीडित तरुणी मूळची गडचिरोली जिल्ह्यातील असून, ती चंद्रपुरातील तुकूम परिसरात भाड्याने खोली घेऊन राहते. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ती आपल्या खोलीत झोपलेली होती. तिची मैत्रीण शारीरिक चाचणीच्या तयारीसाठी बाहेर गेली होती. याच संधीचा फायदा घेत घरमालक किसन रामचंद्र गुंजेकर ५९ वर्ष याने कोणतीही परवानगी न घेता तरुणीच्या खोलीत प्रवेश केला.

खोलीत प्रवेश केल्यानंतर आरोपीने आपल्या पत्नीपासून सुख मिळत नसल्याचे सांगत तरुणीशी अश्लील स्वरूपाचे संभाषण केले. त्यानंतर त्याने कमरेखालील कपडे काढून तरुणीसमोर अश्लील अंगप्रदर्शन केले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने आरडाओरड केली आणि शेजारच्या खोलीत राहणाऱ्या मैत्रिणींकडे धाव घेतली.

तरुणीने मैत्रिणींना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी घरमालकाची पत्नी यांना याची माहिती दिली. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे घरमालकाच्या या प्रकारामुळे भयभीत झालेल्या तरुणींनी अखेर पोलिसांकडे धाव घेण्याचा निर्णय घेतला. पीडित तरुणीने धाडस दाखवत दुर्गापूर पोलीस ठाणे गाठले आणि प्रभारी पोलीस निरीक्षक युवराज सहारे यांच्याकडे तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी किसन रामचंद्र गुंजेकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ७४, ७५(१) आणि ३३२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.





  Print






Related Photos