लोक महाविद्यालयात सेवा संकल्प अभियान : कौशल्य विकासातून रोजगाराच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वर्धा यांच्या वतीने युवक-युवतींना कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकतेच्या विविध संधींसह शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी वर्धा येथील लोक महाविद्यालयात जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त डॉ. सुधाकर झळके यांनी लोक महाविद्यालयाला भेट देऊन प्राचार्य डॉ. महेंद्र सहारे यांच्याशी चर्चा केली. यावेळी सेवा संकल्प अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकतेशी संबंधित विविध योजनांची माहिती देण्यात आली.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी, उपलब्ध रोजगाराच्या संधी, उद्योजकतेसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना तसेच रोजगार विषयक सेवांची माहिती देण्यात आली. शासनाच्या रोजगार विषयक सेवांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी एम्प्लॉयमेंट कार्ड काढून रोजगार पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या जनजागृती उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोक महाविद्यालयातील एकूण २२३ विद्यार्थ्यांनी एम्प्लॉयमेंट कार्ड काढून रोजगार पोर्टलवर नोंदणी केली. त्यामुळे या विद्यार्थ्यांना भविष्यात उपलब्ध होणाऱ्या विविध रोजगाराच्या संधी तसेच इतर रोजगार विषयक सेवांचा लाभ घेणे सुलभ होणार आहे.
या उपक्रमास कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक अधिकारी रुपसिंग ठाकूर, कनिष्ठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक अधिकारी प्रदीप नेमाडे, लोक महाविद्यालयाचे प्रा. डॉ. महेश कोंबे व प्रा. पराग नरसिंगकर उपस्थित होते.




Petrol Price




