भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त १३ ते १८ नोव्हेंबर दरम्यान जनजाती गौरव सप्ताहाचे आयोजन


- विविध योजनांचे लाभ वितरण, आदिवासी संस्कृती रॅली, आरोग्य शिबिर, रोजगार व शैक्षणिक मार्गदर्शनासह विविध उपक्रम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त तसेच जनजातीय गौरव दिनाचे औचित्य साधून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भंडारा यांच्या वतीने दिनांक १३ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जनजाती गौरव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजाचे आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सक्षमीकरण, शासकीय योजनांचा लाभ, आरोग्यविषयक जनजागृती, रोजगाराच्या संधी आणि आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यावर भर देण्यात येणार आहे.
सप्ताहाच्या पहिल्या दिवशी, १३ नोव्हेंबर रोजी न्यूक्लिअस बजेट योजना, धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (DA JGUA) व PM-JANMAN अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ व धनादेशांचे वितरण करण्यात येणार आहे. महिला बचत गटांना आर्थिक मदत व स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन केले जाईल. तसेच शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, खापा खुर्द, ता. तुमसर येथे इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या मुलींच्या पालकांना सुकन्या समृद्धी योजनेबाबत मार्गदर्शन करून नोंदणीची कार्यवाही करण्यात येणार आहे.
१४ नोव्हेंबर रोजी आदिवासी स्मारके व स्वातंत्र्यसैनिकांच्या पुतळ्यांची तसेच परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे. सायंकाळी गोंडराजे बख्त बुलंदशाह यांनी निर्मिती केलेल्या ऐतिहासिक आंबागड किल्ला, ता. तुमसर येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
१५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त तुमसर येथे आदिवासी संस्कृतीविषयक रॅली काढण्यात येणार आहे. यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल. आदिवासी समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदिवासी सेवकांचा सन्मान तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदिवासी युवक-युवती, खेळाडू, गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कलावंतांचा सत्कार करण्यात येणार आहे.
१६ नोव्हेंबर रोजी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी आधार कार्ड दुरुस्ती व विविध शासकीय कागदपत्रांसंदर्भात सेवा शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. यासोबतच वनपट्टेधारकांना विविध योजनांचे लाभ वितरित करणे आणि डिजिटल माध्यमातून शासकीय अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. १७ नोव्हेंबर रोजी आरोग्य व पोषण जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रक्तदाब, मधुमेह व सिकलसेल आजार तपासणी, माता-बाल आरोग्य आणि पोषण आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरणे व अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
१८ नोव्हेंबर रोजी आदिवासी आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सक्षमीकरण दिवस साजरा करून सप्ताहाचा समारोप करण्यात येणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, जात वैधता प्रमाणपत्र व स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. आयटीआय व कौशल्य विकास विभागामार्फत रोजगाराच्या संधी आणि स्वयंरोजगाराबाबत माहिती देण्यात येणार आहे. तसेच वनपट्टेधारकांना सातबारा व इतर दाखल्यांचे वाटप करण्यासंदर्भात शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आणि आदिवासींची समृद्ध संस्कृती, परंपरा व ऐतिहासिक वारसा यांचा गौरव करणे हा या सप्ताहाच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे. भंडारा जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी या सप्ताहानिमित्त आयोजित विविध उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी दीपक हेडाऊ यांनी केले आहे.




Petrol Price




