महत्वाच्या बातम्या

 दैवाने हिरावला संसाराचा आधार : वीज कोसळून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा करुण अंत, पत्नी गंभीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : पोंभूर्णा तालुक्यातील चेकठाणेवासना येथे शेतातील काम आटोपून घरी परतणाऱ्या दाम्पत्यावर अचानक वीज कोसळल्याची गंभीर घटना आज दुपारी ३.३० वाजता सुमारास घडली. या दुर्घटनेत ५५ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

चेकठाणेवासना येथील केशव डोनु गुडी (वय ५५) आणि त्यांच्या पत्नी वैशाली केशव गुडी (वय ४५) हे नेहमीप्रमाणे शेतातील कामासाठी गेले होते. दिवसभराचे काम आटोपून दोघेही सायंकाळच्या सुमारास घरी परतत होते. दरम्यान, ऋषी आलाम यांच्या शेताजवळ अचानक हवामानात बदल झाला आणि त्यांच्यावर वीज कोसळली.

वीजेच्या तीव्र झटक्यामुळे केशव गुडी यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी वैशाली गुडी या गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमी वैशाली यांना तातडीने पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

वैशाली यांची प्रकृती चिंताजनक असल्याने ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे चेकठाणेवासना गावावर शोककळा पसरली असून, गुडी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेमुळे ग्रामस्थांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.





  Print






Related Photos