स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात नाराजी


- सर्वसामान्यांवर आर्थिक बोजा पडण्याची भीती : जुनी मीटर व्यवस्था कायम ठेवण्याची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भद्रावती : महावितरणकडून शहरात सुरू असलेल्या स्मार्ट विद्युत मीटर बसविण्याच्या मोहिमेबाबत सर्वसामान्य वीज ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वीज वापराची नोंद करण्याची प्रक्रिया राबविली जात असली, तरी या योजनेमुळे सर्वसामान्य तसेच गोरगरीब ग्राहकांवर भविष्यात आर्थिक बोजा पडण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करू नये, तसेच यापूर्वी बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर तातडीने काढून पूर्वीचीच मीटर व्यवस्था कायम ठेवावी, अशी मागणी नगरसेवक राहुल सोनटक्के यांनी केली आहे.
यासंदर्भात सोनटक्के यांनी महावितरणच्या उपअभियंत्यांना निवेदन देऊन शहरात सुरू असलेल्या स्मार्ट मीटरच्या मोहिमेबाबत नागरिकांच्या भावना आणि त्यांच्या शंकांकडे लक्ष वेधले. स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांमध्ये अद्याप पुरेशी स्पष्टता नसून, या मीटरच्या वापरामुळे वीज बिलावर नेमका काय परिणाम होणार, याबाबत अनेक ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले.
सक्तीऐवजी जनजागृतीची गरज -
स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी ग्राहकांना त्याची कार्यपद्धती, वीज वापराची नोंद, बिलिंगची प्रक्रिया आणि ग्राहकांच्या हक्कांबाबत योग्य व सविस्तर माहिती देणे आवश्यक आहे. नागरिकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी महावितरणने जनजागृती करावी. मात्र, माहिती न देता किंवा ग्राहकांच्या संमतीचा विचार न करता स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया राबवू नये, अशी भूमिका राहुल सोनटक्के यांनी मांडली.
शहरातील अनेक सर्वसामान्य नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे नियमित वीज बिलाचा खर्च भागवितात. अशा परिस्थितीत स्मार्ट मीटरच्या मोहिमेमुळे त्यांच्यावर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही, याची खात्री महावितरणने करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या हिताचा विचार करूनच वीज वितरणातील बदल करण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
बसविलेले मीटर काढण्याची मागणी -
स्मार्ट मीटरबाबत नागरिकांमध्ये असलेला संभ्रम दूर होईपर्यंत त्याच्या अंमलबजावणीला सक्तीचे स्वरूप देऊ नये. तसेच शहरात यापूर्वी बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर तातडीने काढून जुनी मीटर व्यवस्था पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. महावितरणने ग्राहकांच्या तक्रारी आणि शंकांची गांभीर्याने दखल घेऊन या मोहिमेचा पुनर्विचार करावा. वीज ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देत कोणताही निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सोनटक्के यांनी व्यक्त केली.




Petrol Price




