महत्वाच्या बातम्या

 धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर शहरात जड वाहनास प्रवेश बंदी


- दुचाकी व चारचाकी वाहनांच्या रहदारीकरीता पर्यायी मार्गाची व्यवस्था 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरांमध्ये दीक्षाभूमी मैदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर येथे 15 व 16 ऑक्टोबर 2022 रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या सोहळ्यास जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनुयायी मोठ्या संख्येने येत असतात. यादरम्यान वाहतूक व रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यादृष्टीने चंद्रपूर शहरातून दीक्षाभूमी परीसराकडे जाणाऱ्या रहदारीचा मार्ग 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजतापासून 17 ऑक्टोबर रोजीचे सकाळी 8 वाजेपर्यंतच्या सर्व प्रकारच्या वाहनांची रहदारी वळविणे तसेच जड वाहनांस प्रवेश बंदी करण्यात येत आहे, असे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी कळविले आहे.

15 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजतापासून 17 ऑक्टोबर रोजीच्या सकाळी 8 वाजेपर्यंत नागपूरकडून चंद्रपूरकडे येणारी जड वाहने हॉटेल कुंदन प्लाझा पलीकडेच थांबून राहतील. मुलकडून नागपूरकडे जाणारी जड वाहने एम.ई.एल नाका चौक येथेच थांबतील. बल्लारशाकडून नागपूरकडे जाणारी वाहने बंगाली कॅम्प पलीकडे डी.आर.सी बंकर, बायपास रोड येथेच थांबून राहतील. दीक्षाभूमी मार्गावरील अनुयायांची गर्दी पाहून आवश्यकतेनुसार सदर प्रवेश बंदीमध्ये शिथिलता देण्यात येईल.


शहरातील दुचाकी व चारचाकी (हलकी) वाहनांकरीता रहदारी व्यवस्था:

जुना वरोरा नाका चौक ते आंबेडकर महाविद्यालय-मित्र नगर चौक-टीबी हॉस्पिटलपर्यंतचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनाकरिता (सायकल सहित) बंद करण्यात येत आहे. पाण्याची टाकी-विश्रामगृह-जुना वरोरा नाका हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांकरीता (सायकल सहित) दोन्ही बाजूने बंद करण्यात येत आहे. नागपूरकडून शहराकडे जाणारी वाहने (जड वाहने वगळून) वरोरा नाका-उड्डाणपूल-सिद्धार्थ हॉटेल-बस स्टॅन्ड-प्रियदर्शनी चौक मार्गे शहराकडे जातील. रामनगर, मित्रनगर, आकाशवाणी, स्नेहनगर व वडगाव परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी पाण्याची टाकी-दवा बाजार-संत केवलराम चौक-दाताळा रोडमार्गे पर्यायी रस्त्याने आपली वाहने (जड वाहने वगळून) घेऊन जावीत. त्याचप्रमाणे जटपुरा गेटकडून रामनगर मार्गे जुना वरोरा नाक्याकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी आपली वाहने पाण्याची टाकी-प्रियदर्शनी चौक-बस स्टॅन्ड-सिद्धार्थ हॉटेल-उड्डाणपूल मार्गे नागपूरकडे जातील.

दीक्षाभूमी येथे जाणाऱ्या बौद्ध बांधवांची गर्दी पाहता पाण्याची टाकी चौक-जुना वरोरा नाका, आय.टी.आय कॉर्नर, पत्रकार भवन, उड्डाणपूल व दीक्षाभूमी परिसर तसेच वरोरा नाका चौक-संत केवळराम चौक व मित्रनगर चौक ते जिल्हा स्टेडियमपर्यंत नो पार्किंग व नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे. त्यामुळे निर्देशित काळात सदर परिसरात कोणतीही वाहने, हॉकर्स लावण्यात येऊ नये. दीक्षाभूमी ते संत केवळराम चौक यादरम्यान राहणाऱ्या रहिवाशांनी आपली वाहने रस्त्याच्या बाजूला उभी न करता घोषित करण्यात आलेल्या पार्किंगमध्ये  ठेवावी. आय.टी.आय कॉलेज ते जिल्हा स्टेडियमपर्यंत तसेच वरोरा नाका दर्ग्याच्या उजव्या बाजूने जाणारा रस्ता-पुठ्ठेवार हॉस्पिटल-बुक्कावार हॉस्पिटल-वरोरा नाका ते पिंक प्लॅनेटपर्यंत नो पार्किंग झोन व नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात यावा.


दीक्षाभूमीवर येणाऱ्या नागरिक व अनुयांयाकरीता वाहन पार्किंगस्थळ :

नागपूर रोडने दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांनी त्यांची दुचाकी व चारचाकी वाहने शकुंतला लॉन, जनता कॉलेज समोरील पटांगण व जनता कॉलेज समोरील ईदगाह मैदान, शहरातून दीक्षाभूमीकडे येणारी वाहने सेंट मायकल स्कूल मैदान व सिंधी पंचायत भवन येथे पार्क करावी. वडगांव, आकाशवाणी व लगतच्या परिसरातून दीक्षाभूमीकडे येणारी वाहने लोकमान्य टिळक हायस्कूल जिल्हा स्टेडियमच्या मागे, व जीवन साफल्य गृहनिर्माण सहकारी संस्था मनोमय दवाखान्याच्या पाठीमागे या ठिकाणी पार्क करावीत. तसेच मुल रोड, बंगाली कॅम्प व तुकूम परिसरातून येणाऱ्या अनुयायांनी आपली वाहने कृषी भवन जवळील मैदान, ट्रॅव्हल्स स्टॅन्ड येथे पार्क करावीत.

तरी, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळ्यात सहभागी सर्व बौद्ध बांधवांनी व अनुयायांनी वाहतूक व्यवस्थेचा वापर करून घोषित पार्किंग व्यवस्थेमध्येच आपली वाहने ठेवून वाहतूक व्यवस्थेचे पालन करावे, तसेच शांतता व

सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos