औषधे बाहेरून विकत घेण्याची गरज नाही : झिरो प्रिस्क्रिप्शन च्या निविदा प्रक्रियेस सुरुवात
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिसेंबर महिन्यात मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी राबविण्याचे आदेश दिले होते. या आदेशामुळे आता रुग्णांना कोणतेही औषध बाहेरून विकत घेण्याची गरज भासणार नाही.
त्यामुळे आता सर्व औषधे महापालिकेतर्फे मोफत देण्यात येणार आहेत. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी महापालिकेतर्फे निविदा प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे. झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसीमुळे महापालिकेला सध्याच्या औषधखरेदीवर होणाऱ्या खर्चापेक्षा सुमारे १ हजार ४०० कोटी रुपये अधिक खर्च करावा लागणार आहे. सार्वजनिक व्यवस्थेतील रुग्णालयांत अनेक औषधे मिळत नसल्यामुळे ती रुग्णांना बाहेरून विकत घ्यावी लागत असल्याचे चित्र राज्यभर दिसत आहे.
ही मोठी योजना आहे. यासाठी सर्व गोष्टींचा अभ्यास करून आम्ही निर्णय घेत आहोत. १ हजार ४०० कोटी खर्च येणार आहे. सध्या झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी राबविण्यासाठी लागणाऱ्या निविदा प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी महापालिकेच्या सर्व रुग्णालयांत राबविण्यात येईल.- डॉ. सुधाकर शिंदे, अतिरिक्त आयुक्त (आरोग्य)
औषधखरेदीसाठी तब्बल ६०० कोटी रुपयांची खरेदी :
महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी केंद्राकडून औषध खरेदी वेळेवर न झाल्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयात अनेक औषधे मिळत नसल्याचे अनेकदा दिसून आले.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी महापालिकेच्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता आणि उपनगरीय रुग्णालयाचे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सध्याच्या औषधखरेदीचा आढावा घेतला आहे.
पालिका रुग्णालयात दररोज लाखो रुग्ण उपचारासाठी भेटी देत असतात. सध्याच्या घडीला पालिकेच्या मुख्य रुग्णालयाच्या औषधखरेदीसाठी सुमारे ६०० कोटी रुपयांची खरेदी केली जाते. मात्र या नवीन पॉलिसीसाठी मोठा खर्च येणार असल्याने महापालिका त्यासाठी निविदा योग्य पद्धतीने आखण्यासाठी सर्व बाबींचा विचार करत आहे.
News - Rajy