महत्वाच्या बातम्या

 जिवती तालुका बनतोय बालविवाहाचा हॉटस्पॉट : आणखी एक बालविवाह थांबवला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात बालविवाहाच्या घटना सातत्याने समोर येत असून विशेषतः जिवती तालुक्यात अशा प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने हा तालुका बालविवाहाचा हॉटस्पॉट ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अशातच जिल्हा चाईल्ड हेल्प लाईन चंद्रपूरच्या सतर्क आणि तत्पर कारवाईमुळे जिवती तालुक्यातील एका गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात यश आले आहे.

चाईल्ड हेल्प लाईनच्या कंट्रोल रूमवरून प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार, जिवती तालुक्यातील एका गावात अल्पवयीन बालिकेचा विवाह लावून देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. माहिती मिळताच जिल्हा चाईल्ड हेल्प लाईनचे पथक ॲक्शन मोडवर आले. संबंधित मुलीच्या वयाची कागदपत्रे तपासण्यात आली असता तिचे वय १७ वर्षे ९ महिने असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हा विवाह बालविवाह प्रतिबंध कायदा २००६ अंतर्गत बेकायदेशीर ठरत असल्याचे निदर्शनास आले.

यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मीनाक्षी भस्मे, बाल कल्याण समिती अध्यक्षा क्षमा बासारकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर तसेच प्रकल्प समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा चाईल्ड हेल्प लाईनच्या समुपदेशिका दिपाली मसराम आणि केस वर्कर अंकुश उराडे यांनी तातडीने संबंधित गाव गाठले.

ग्राम बाल संरक्षण समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या सहकार्याने संबंधित बालिकेच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. यावेळी कुटुंबीयांचे सविस्तर समुपदेशन करण्यात आले. बालविवाह प्रतिबंध कायदा २००६ अंतर्गत मुलीचे किमान वय १८ वर्षे आणि मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण असणे आवश्यक असल्याची माहिती देण्यात आली. तसेच बालविवाह हा केवळ कायद्याचा भंग नसून मुलांच्या शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षित भवितव्याशी संबंधित मूलभूत हक्कांचे उल्लंघन असल्याचेही समजावून सांगण्यात आले.

यावेळी बालविवाह घडवून आणणारे, त्यास प्रोत्साहन देणारे, सहभागी होणारे किंवा परवानगी देणाऱ्या पालक व संबंधित व्यक्तींवर बालविवाह प्रतिबंध कायदा २००६ अंतर्गत कठोर कारवाई होऊ शकते, याचीही जाणीव करून देण्यात आली. संबंधितांना दोन वर्षांपर्यंत कारावास आणि/किंवा एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असल्याची माहिती देत कायद्याचे गांभीर्य स्पष्ट करण्यात आले.

समुपदेशनानंतर संबंधित कुटुंबीयांनी बालविवाह थांबविण्यास सहमती दर्शविली. तसेच पुढील समुपदेशनासाठी संबंधित बालिकेला बाल कल्याण समिती, चंद्रपूर समोर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी कुटुंबीयांचे प्रबोधन करण्यात आले.

या संपूर्ण कारवाईदरम्यान जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मीनाक्षी भस्मे, बाल कल्याण समिती अध्यक्षा क्षमा बासारकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर तसेच प्रकल्प समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा चाईल्ड हेल्प लाईनच्या समुपदेशिका दिपाली मसराम आणि केस वर्कर अंकुश उराडे यांनी मोलाची कामगिरी केले. बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन, महिला व बाल विकास विभाग आणि ग्रामस्तरावरील यंत्रणांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos