महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विकासकामांचा शुभारंभ व भूमिपूजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नगरपरिषदेमार्फत विविध विकासकामांचा शुभारंभ व भूमिपूजन कार्यक्रम उत्साहात पार पडला. शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सिमेंट रस्ते, नाली बांधकाम, पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था तसेच परिसर सुशोभीकरणाची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत.

या विकासकामांचे भूमिपूजन नगरपरिषद गडचिरोलीच्या नगराध्यक्ष ॲड. प्रणोती सागर निंबोरकर, उपाध्यक्ष निखिलजी चरडे आणि बांधकाम सभापती अनिलजी कुनघाडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी संबंधित प्रभागांतील नगरसेवक, नगरपरिषदेचे अधिकारी, पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील अनेक भागांमध्ये जुने व खराब झालेले रस्ते, अपुरी नाली व्यवस्था आणि पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याच्या समस्येमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेमार्फत विविध प्रभागांमध्ये विकासकामांना गती देण्यात आली आहे. नव्याने होणाऱ्या सिमेंट रस्ते व नाली बांधकामामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठी सुविधा निर्माण होणार असून स्वच्छता व्यवस्थेलाही बळकटी मिळणार आहे.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी सांगितले की, गडचिरोली शहराचा सर्वांगीण विकास करणे हा नगरपरिषदेचा मुख्य उद्देश असून नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शहरातील प्रत्येक प्रभागात विकासकामे प्राधान्याने करण्यात येत आहेत.

स्थानिक नागरिकांनी देखील या विकासकामांचे स्वागत केले असून शहराच्या प्रगतीसाठी ही कामे महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त केले. तसेच नगरपरिषदेच्या माध्यमातून भविष्यातही विविध विकास प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos