गणरायाच्या विसर्जनाला AI सुरक्षेची साथ : चोरट्यांवर आणि तडीपारांवर पोलिसांची करडी नजर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : ढोल-ताशांचा गजर, गणरायाचा जयघोष आणि हजारोंच्या गर्दीत भावपूर्ण वातावरणात पार पडलेल्या गणपती विसर्जन सोहळ्याला यंदा आधुनिक तंत्रज्ञानाची सुरक्षा लाभली. गणरायाला निरोप देण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी चंद्रपूर पोलीस दलाने AI आधारित CCTV Surveillance Van च्या माध्यमातून विसर्जन मिरवणुकांवर पावलोपावली नजर ठेवली. या तंत्रज्ञानामुळे तडीपार इसमांपासून गर्दीचा फायदा घेणाऱ्या चोरट्यांपर्यंत पोलिसांचे लक्ष पोहोचले.
पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या संकल्पनेतून दाखल झालेल्या AI CCTV Surveillance Van चा गणेश विसर्जन काळात प्रभावी वापर करण्यात आला. या प्रणालीमध्ये चंद्रपूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यांतील गर्दीच्या ठिकाणी चोरी करणारे आरोपी तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तडीपार करण्यात आलेल्या इसमांसह १ हजार ५०० हून अधिक आरोपींची माहिती समाविष्ट करण्यात आली होती. त्यामुळे उत्सवाच्या गर्दीत संशयित हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे शक्य झाले.
गणरायाच्या विसर्जनासाठी शहरातील प्रमुख चौक, विसर्जन मार्ग, संवेदनशील ठिकाणे आणि गर्दीच्या परिसरात भाविकांचा जनसागर उसळला होता. या गर्दीत प्रत्येकाच्या सुरक्षिततेची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर होती. अत्याधुनिक कॅमेऱ्यांनी सज्ज असलेल्या AI CCTV व्हॅनमधून या संपूर्ण परिसराचे रिअल-टाइम मॉनिटरिंग करण्यात आले. त्यामुळे गर्दीच्या हालचालींसोबतच संशयास्पद व्यक्तींच्या हालचालीही पोलिसांच्या नजरेत राहिल्या.
गणेशोत्सवाच्या काळात तडीपार इसमांकडून कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली. AI प्रणालीच्या माध्यमातून संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्यास संबंधित पोलीस पथकांना तातडीने सतर्क करण्यात आले. आवश्यक पडताळणी आणि प्रतिबंधात्मक कारवाईमुळे उत्सवाच्या काळात अनुचित प्रकारांना आळा घालण्यास मदत झाली.
गणरायाच्या निरोपासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीत मोबाईल, पाकीट, दागिने यांसारख्या मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा गर्दीच्या ठिकाणी AI CCTV च्या माध्यमातून विशेष नजर ठेवण्यात आली. संशयास्पदपणे फिरणाऱ्या व्यक्ती, वारंवार ठिकाण बदलणाऱ्या हालचाली आणि चोरीच्या उद्देशाने संशयास्पद वर्तन करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी करणाऱ्या इसमांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्या टोळीचा शोध सुरू आहे. CCTV निगराणीमुळे संशयितांची ओळख पटविणे आणि त्यांच्या हालचालींचा माग काढणे पोलिसांना अधिक सुलभ झाले.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान एखादी संभाव्य समस्या निर्माण होण्यापूर्वीच तिची माहिती संबंधित यंत्रणेला मिळावी, यासाठी CCTV व्हॅनमधून मिळणारी माहिती पोलीस नियंत्रण कक्ष आणि मैदानावरील पथकांना तात्काळ देण्यात आली. त्यामुळे गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्था राखताना पोलिसांचा प्रतिसाद अधिक गतिमान झाला.
गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी रस्त्यावर आलेल्या प्रत्येक भाविकाचा उत्सव सुरक्षित व्हावा, यासाठी पारंपरिक पोलीस बंदोबस्तासोबत तंत्रज्ञानाचीही भक्कम साथ मिळाली. AI CCTV Surveillance Van च्या माध्यमातून तडीपार इसमांवर नजर, चोरट्यांच्या हालचालींवर नियंत्रण आणि गर्दीच्या ठिकाणी प्रभावी निगराणी ठेवण्यात चंद्रपूर पोलिसांना यश आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या या तिसऱ्या डोळ्या मुळे गणरायाचा विसर्जन सोहळा अधिक सुरक्षित करण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नांना बळ मिळाले.




Petrol Price




