बारामती सह सहा ठिकाणी नवीन शासकीय नर्सिंग महाविद्यालयाला मंजुरी
- शासकीय महाविद्यालयाला संलग्न १०० विद्यार्थी प्रवेश क्षमता
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी राज्यात बारामतीसह जळगाव, लातूर, सांगली (मिरज), नंदुरबार व गोंदिया अशा सहा ठिकाणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न प्रत्येकी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या नवीन शासकीय नर्सिंग महाविद्यालयांना राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली.
आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून बारामतीत शासकीय नर्सिंग महाविद्यालय होत आहे.
राज्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून राज्यात सहा नवीन शासकीय नर्सिंग महाविद्यालयांना मंजूरी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामध्ये बारामती, जळगांव, लातूर, सांगली (मिरज), नंदुरबार व गोंदिया या नर्सिंग महाविद्यालयांचा समावेश आहे.
नवीन नर्सिंग महाविद्यालयामुळे बारामतीच्या वैद्यकीय क्षेत्राला बळकटी मिळणार आहे.
बारामतीमध्ये सध्या अहिल्याबाई होळकर बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित झाले असून त्याला संलग्न हे शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय नर्सिंग महाविद्यालय होणार आहे. त्याचबरोबर बारामतीत शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे काम सुरु आहे.
आता नव्याने मंजूर झालेल्या शासकीय नर्सिंग महाविद्यालयामुळे बारामतीच्या वैद्यकीय क्षेत्राला बळकटी मिळणार आहे. बारामती येथे होणाऱ्या या शासकीय नर्सिंग महाविद्यालयाचा फायदा पुणे जिल्ह्याबरोबरच बारामतीला लागून असणाऱ्या सातारा, अहमदनगर, सोलापूर येथील विद्यार्थ्यांना आणि तेथून येणाऱ्या रुग्णांना होणार आहे.
News - Rajy