चामोर्शी तालुकास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत ४८ खेळाडूंचा सहभाग


- आष्टीच्या लिटल हार्ट इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये स्पर्धा उत्साहात संपन्न : विजेत्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आष्टी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली व जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चामोर्शी तालुकास्तरीय शालेय कराटे स्पर्धा शनिवार, २६ सप्टेंबर रोजी आष्टी येथील लिटल हार्ट इंग्लिश मीडियम हायस्कूल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या स्पर्धेत चामोर्शी तालुक्यातील विविध शाळांमधील एकूण ४८ खेळाडूंनी सहभाग घेतला.
तालुका क्रीडा संयोजक राकेश खेवले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेची संपूर्ण तांत्रिक जबाबदारी कराटे प्रशिक्षक कपिल मसराम यांनी सांभाळली. स्पर्धेचे उद्घाटन लिटल हार्ट इंग्लिश मीडियम हायस्कूलचे प्राचार्य कृष्णमूर्ती गादे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य रमेश आरे होते.
यावेळी विशेष अतिथी म्हणून शिवाजी हायस्कूल, चामोर्शीचे क्रीडा शिक्षक धनराज चंदनखेडे, कराटे प्रशिक्षक मिलिंद गेडाम, डिजनीलॅन्ड स्कूल, चामोर्शीचे मुख्याध्यापक विलास जिल्हापेल्ली उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप सहारे व सचिन पिपरे यांच्यासह लिटल हार्ट इंग्लिश मीडियम हायस्कूलचे शिक्षकवृंद उपस्थित होते.
तीन वयोगटांत रंगली कराटे स्पर्धा -
तालुकास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत १४ वर्षांखालील मुले-मुली, १७ वर्षांखालील मुले-मुली आणि १९ वर्षांखालील मुले-मुली अशा तीन वयोगटांत विविध वजनगटांमध्ये सामने घेण्यात आले. सहभागी खेळाडूंनी कराटेतील कौशल्य, चपळता, शारीरिक तंदुरुस्ती आणि विविध डावपेचांचे उत्कृष्ट प्रदर्शन करत उपस्थितांची दाद मिळवली.
१४ वर्षांखालील मुलींच्या ३८ ते ४२ किलो वजनगटात कु. मानवी सुनील बामणकार हिने आपल्या खेळातील उत्कृष्ट कौशल्य आणि योग्य तालमेल दाखवत अंतिम सामन्यात विजय मिळविला. तिच्या आत्मविश्वासपूर्ण खेळाने उपस्थितांची मने जिंकली. तर १७ वर्षांखालील मुलांच्या ३५ किलो वजनगटात श्रीहर्ष रमेश आरे याने अंतिम सामन्यात विविध कौशल्ये आणि आधुनिक डावपेचांचा प्रभावी वापर करत विजय मिळविला. त्याचा अंतिम सामना चुरशीचा व रोमांचक ठरला. या दोन्ही खेळाडूंनी लिटल हार्ट इंग्लिश मीडियम हायस्कूल, आष्टीचे प्रतिनिधित्व केले.
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विजेत्यांची निवड -
तालुकास्तरीय स्पर्धेतील विजयी खेळाडूंची २९ सप्टेंबर २०२६ रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे तालुकास्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आता जिल्हास्तरावर आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी मिळणार आहे.
पंच व अधिकाऱ्यांच्या अचूक निर्णयामुळे स्पर्धा सुरळीत -
स्पर्धेतील सामने पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी पंच व अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मुख्य पंच म्हणून मिलिंद गेडाम व अनिकेत हजारे यांनी काम पाहिले. तर मुख्य परीक्षक म्हणून आचल अलोणे, रिया वाट, सलोनी समूदर आणि राज दुर्गे यांनी जबाबदारी सांभाळली. संपूर्ण स्पर्धेदरम्यान कोणताही वादविवाद निर्माण न होता पंच व परीक्षकांनी योग्य निर्णय देत स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली. गुणलेखक म्हणून सानिका दुर्गे, तर वेळाधिकारी म्हणून लावण्या कोवे यांनी जबाबदारी पार पाडली.
आयोजकांचे परिश्रम -
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चामोर्शी तालुका क्रीडा संयोजक राकेश खेवले, तांत्रिक अधिकारी कपिल मसराम, शिवाजी हायस्कूल, चामोर्शीचे क्रीडा शिक्षक धनराज चंदनखेडे तसेच लिटल हार्ट इंग्लिश मीडियम हायस्कूल, आष्टीचे क्रीडा शिक्षक नितेश पूंगाटी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश खोब्रागडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन नितेश पूंगाटी यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे चामोर्शी तालुक्यातील शालेय खेळाडूंना कराटे क्रीडा प्रकारात आपले कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले.




Petrol Price




