गडचिरोली जिल्हा रुग्णालयाची एसी बंद गॅस चेंबर स्थिती : आझाद समाज पक्षाचा सवाल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्हा रुग्णालयाचे प्रशासन नेहमीच वादग्रस्त ठरत असतानाही येथे रुग्णांच्या जीवनाची सुरक्षा होत नाही, अशी तक्रार आझाद समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी प्रशासनावर प्रश्न उपस्थित केला की, मुख्यमंत्री पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातील रुग्णालय प्रशासन फक्त मोठ्या खरेदी आणि कामात व्यस्त आहे की रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी आहे?
आज सकाळी जिल्हाध्यक्ष बन्सोड हे काही रुग्णांना भेट देण्यासाठी रुग्णालयातील कॅज्युलटी वार्ड मध्ये गेले असता त्यांनी लक्षात घेतले की या वार्डमधील सर्व एसी बंद आहेत. या परिस्थितीमुळे रुग्ण, त्यांच्या नातेवाईक आणि तिथे येणारे डॉक्टरही फक्त पाच-दहा मिनिटेच थांबू शकतात. त्याचसोबत, दोन दिवसांपूर्वी या वार्डात एकाच दिवशी तीन रुग्णांचा मृत्यू झाला होता. बन्सोड यांनी प्रश्न उपस्थित केला की, हे मृत्यू गॅस चेंबर स्थितीमुळे झाले असतील तर?
याशिवाय, जिल्हाध्यक्ष बन्सोड यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांशी भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण शल्यचिकित्सक उपस्थित नसल्यामुळे त्यांची भेट झाली नाही.
बन्सोड यांनी प्रशासनाला इशारा दिला की, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या भोंगळ कारभारावर जिल्हाधिकारी लक्ष ठेवणार नाहीत तर, ते जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन करण्यास तयार आहेत.
राज बन्सोड यांनी स्पष्ट केले की, रुग्णालय प्रशासनाकडे रुग्णांच्या जीवनाची जबाबदारी आहे आणि प्रशासनाकडून लगेच उपाययोजना अपेक्षित आहेत.
News - Gadchiroli




Petrol Price




